IPL 2022, KKR vs LSG: डी कॉक नावाच्या वादळात नाईट रायडर्सची नौका बुडाली, कोलकात्याची घरवापसी निश्चित; दणदणीत विजयासह लखनऊला प्लेऑफचे तिकीट
क्विंटन डी कॉक (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs LSG: केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) फक्त 2 धावांनी विजय मिळवला आणि प्लेऑफ शर्यतीतील त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. लखनऊ संघाने दिलेल्या 211 धावांच्या भव्य धावसंख्येचा पाठलाग करताना केकेआर (KKR) ओव्हरमध्ये 8 बाद 208 धावाच करू शकले, परिणामी रोमहर्षक सामन्यात संघाला निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. केकेआरकडून कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वाधिक 50 धावा केल्या. तसेच नितीश राणाने 42 आणि सॅम बिलिंग्सने 36 धावांचे छोटेखानी योगदान दिले. याशिवाय अन्य धुरंधर फलंदाज अपेक्षेनुसार खेळ करू शकले नाही, ज्यामुळे संघाने घरवापसीचे तिकीट मिळवले. तर कोलकात्यावरील विजयाने लखनऊ सुपर जायंट्स संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला आहे आणि त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. (IPL 2022: LSG vs KKR: लखनऊचा कर्णधार KL Rahul ची धमाल, आयपीएलमध्ये अशी कमाल करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज)

लखनऊने दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात अगदी खराब झाली आणि अवघ्या 9 धावांवर संघाचे दोन्ही सलामीवीर पॅव्हिलियनमध्ये परतले. यानंतर कर्णधार श्रेयसच्या साथीने नितीश राणाने मोर्चा सांभाळा आणि दोघांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव स्थिरावला. नितीश बाद झाल्यावर बिलिंगने देखील कर्णधार श्रेयस सोबत चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान अय्यर अर्धशतक करून पॅव्हिलियनमध्ये परतला. श्रेयस पाठोपाठ बिलिंग्स आणि आंद्रे रसेल देखील झटपट बाद झाले. त्यानंतर सुनील नारायण आणि रिंकू सिंह यांच्या जोडीने जोरदार फटकेबाजी करून संघाला विजयाच्या जवळ नेले. शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी 21 धावांची गरज होती. मार्कस स्टोइनिसच्या पहिल्या चेंडूवर रिंकू सिंहने चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर आणि तिसऱ्या चेंडूवर रिंकूने सलग दोन षटकार ठोकत कोलकात्याला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. चौथ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. पण पाचव्या चेंडूवर एविन लुईसने रिंकूचा अप्रतिम झेल घेतला आणि सामन्याचे चित्र पालटले. उमेश यादव शेवटच्या चेंडूवर बाद झाला आणि लखनऊने हा सामना 2 धावांनी खिशात घातला. रिंकू 40 धावा केल्या तर नारायण धावा करून नाबाद राहिले. दुसरीकडे, लखनऊकडून मोहसीन खानने सर्वाधिक तीन विकेट्स घेतले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सने बुधवारी इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध बिनबाद 210 धावा केल्या. डी कॉकने आयपीएलमधील आपले दुसरे शतक झळकावलेआणि 70 चेंडूत 140 धावा करत नाबाद राहिला. तसेच कर्णधार केएल राहुलने 51 चेंडूत 61 धावा केल्या. डी कॉकने आपल्या खेळीत 10 चौकार आणि तितकेच षटकार मारले, तर कर्णधार राहुलने 4 षटकार आणि 3 षटकार ठोकले.