ऋषभ पंत (Photo Credit: Twitter)

IPL 2022, DC vs RR: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स  (Delhi Capitals) यांच्यातील हंगामातील 34 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे खेळला गेला, ज्यामध्ये राजस्थानने 15 धावांनी विजय मिळवला. राजस्थानचा हा मोसमातील पाचवा विजय होता, तर दिल्लीला चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. या सामन्यात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ही पाहायला मिळाला, ज्याची चर्चा दीर्घकाळ होत राहील. डावातील सर्वात महत्त्वाचे 19 वे षटक मेडन फेकून प्रसिद्ध कृष्णाने दिल्लीकडून सामना पूर्णपणे हिसकावून घेतला. दिल्लीकडून कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) 44 धावा केल्या. (IPL 2022, DC vs RR: राजस्थानचा ‘रॉयल’ विजय, नाट्यमय सामन्यात दिल्लीचा 15 धावांनी धुव्वा उडवला; Buttler चे शतक ठरले सरस!)

लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने 8 गडी गमावून 207 धावा केल्या. पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर या सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये अवघ्या 4.3 षटकांत 43 धावांची भागीदारी झाली. वॉर्नर 14 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. येथून शॉने आघाडी घेत 27 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 37 धावा केल्या, तर सरफराज खान अवघ्या एका धावेवर बाद झाला. दिल्लीकडून कर्णधार पंतने 24 चेंडूत 44 धावा केल्या, तर ललित यादवने 37 धावा केल्या. रोवमन पॉवेलने (Rovman Powell) सामन्याच्या शेवटच्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर षटकार ठोकले आणि सामना रोमांचक स्थितीत पोहचवला. येथून दिल्लीला 3 चेंडूत 18 धावांची गरज होती. ओबेद मॅकॉयचा (Obed McCoy) तिसरा बॉल कंबरेच्या वर होता, त्यानंतर डगआऊट मध्ये बसलेले सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे आणि कर्णधार पंत यांनी पंचांना नो-बॉलचा इशारा केला. काही क्षणांच्या संकोचानंतर पंतने थेट पॉवेल आणि कुलदीप यादव यांना परतण्यास सांगितले. पंतने अमरे यांनीही मैदानात जाऊन पंचांशी बोलायला सांगितले पण अखेरीस तो 'वैध चेंडू' मानला गेला. हा प्रश्न सर्वांच्या मनात असेल की मैदानावरील पंच थर्ड अंपायरकडे का गेले नाहीत?

यानंतर ऋषभ पंतच्या वागण्यावर सोशल मीडियात नेटकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर पॉवेलला यष्टिरक्षकाने झेलबाद केले. पॉवेल 15 चेंडूत 5 षटकारांसह 36 धावा करून परतला. तसेच राजस्थान संघाकडून प्रसिद्ध कृष्णाने 3, तर रविचंद्रन अश्विनने 2 बळी घेतले. याशिवाय ओबेद मॅकॉय आणि युजवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1-1 यश मिळाले.