विराट कोहली (Photo Credit: PTI)

‘सुपर संडे’मध्ये आज क्रिकेट जगतातील दोन महान खेळाडू आज आमनेसामने येतील. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर  (Royal Challengers Bangalore) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या 39 व्या सामन्यात मनोरंजक लढत पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या (IPL) दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत या दोन्ही संघांची कामगिरी विशेष राहिली नाही. पण आजचा सामना विराटसाठी संस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरू शकतो कारण तो टी-20 क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आला आहे. आतापर्यंत भारतीय टी-20 क्रिकेटमध्ये हा पराक्रम कोणताही फलंदाज करू शकलेला नाही. विराटला आता हा आकडा गाठण्यासाठी फक्त 13 धावांची गरज आहे. (IPL 2021, RCB vs MI: विराट ‘ब्रिगेड’ आणि रोहितच्या ‘पलटन’मध्ये रंगणार IPL चा घमासान, आरसीबी-मुंबई सामन्यात ‘या’ भारतीयांवर असणार नजर)

कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि लीग क्रिकेटमध्ये 2007 ते 2021 दरम्यान 313 सामन्यांमध्ये एकूण 9987 धावा केल्या आहेत. जर विराटने आज 13 धावा केल्या, तर तो 10,000 टी-20 धावांचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय आणि जगातील पाचवा खेळाडू बनेल. कोहलीच्या आधी क्रिस गेल, किरोन पोलार्ड, शोएब मलिक आणि डेविड वॉर्नर यांनी टी-20 मध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या आहेत. याशिवाय लक्षात घ्यायचे म्हणजे आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा कोहली हा एकमेव फलंदाज आहे. त्याने 2010 ते 2021 दरम्यान 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 3159 धावा केल्या आहेत आणि 3 हजारांचा टप्पा ओलांडणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. यादरम्यान विराटने टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 अर्धशतके केली आहेत. विराट कोहलीने अलीकडेच जाहीर केले की तो आयपीएल 2021 नंतर बेंगलोरच्या कर्णधारपदाचा राजीनामा देईल आणि एक खेळाडू म्हणून संघासाठी खेळत राहील.

विराटने आतापर्यंत 313 टी-20 सामने खेळले आहेत आणि जर RCB कर्णधाराने 303 डावात 10,000 धावांचा टप्पा गाठला, तर 2017 मध्ये फक्त 285 डावांमध्ये 10,000 धावा पूर्ण करणाऱ्या गेलनंतर तो पाच अंकी आकडा गाठणारा दुसरा वेगवान खेळाडू बनेल. वॉर्नर सध्या टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 10,000 धावांचा टप्पा गाठणारा दुसरा आहे. वॉर्नरने 303 डावांमध्ये 28 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) सामन्यात वॉर्नरने या वर्षी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळताना हा टप्पा गाठला होता.