एमएस धोनी आणि सुरेश रैना (Photo Credit: Instagram)

विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध एमएस धोनी (MS Dhoni) यांच्यात झालेल्या आयपीएलच्या  (IPL) 35 व्या सामन्यात पुन्हा एकदा आरसीबी ‘शिष्य’ विराटवर ‘गुरु’ धोनीच भारी पडला. शारजाह (Sharjah) येथे झालेल्या समन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिलेल्या 157 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) 18.1 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून लक्ष्य गाठले. सीएसके (CSK) विरोधात आरसीबीचा (RCB) यंदाच्या हंगामातील हा दुसरा पराभव ठरला. अशाप्रकारे चेन्नईने या सामन्यात विजय मिळवून आयपीएलच्या प्लेऑफसाठी आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. रुतुराज गायकवाडने 38 धावा, अंबाती रायुडू 32 धावा आणि फाफ डु प्लेसिसने 31 धावा केल्या. तसेच सुरेश रैना 17 धावा आणि धोनी 11 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, आरसीबीचे गोलंदाज युएई लेगच्या सलग दुसऱ्या सामन्यात प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. हर्षल पटेल, युजवेंद्र चहल आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तसेच या पराभवाचा आरसीबीला रनरेटमध्ये मोठा फटका बसला आहे. (IPL 2021 RCB vs CSK: विराट कोहलीने लॉर्ड शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर खेचलेला ‘No Look Six’ थेट मैदानाबाहेर, पाहा Video)

नाणेफेक जिंकत धोनीने बेंगलोरला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. या आमंत्रणाचा स्विकार करत बेंगलोरने कोहली व देवदत्त पडिक्क्लच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर 156 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात रुतुराज गायकवाड व फाफ डु प्लेसिसची जोडी सलामीला उतरली. नेहमीप्रमाणे दोघांनी संघाला आश्वासक सुरुवात करून दिली आणि 71 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. चेन्नईची उत्तम सुरुवात झाली असताना आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने चहलच्या चेंडूवर गायकवाडचा सुपरकॅच घेत संघाला पहिले यश मिळवून दिले. गायकवाड पाठोपाठ पुढच्याच षटकात मॅक्सवेलच्या चेंडूवर डु प्लेसिसही झेलबाद झाला.दोन्ही सलामीवीर बाद होताच चेन्नईचा खेळ सावरु पाहणाऱ्या अष्टपैलू मोईन अलीही विराटने जबरदस्त कॅच घेऊन माघारी धाडलं. सामना रंगतदार स्थितीत तेव्हा पोहचला जेव्हा अंतिम क्षणी पटेलने रायुडूला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. पण रैना आणि धोनीच्या जोडीने पुन्हा सूत्रे हाती घेत संघाला विजय मिळवून दिला.

यापूर्वी आरसीबीसाठी कोहलीने 53 आणि पडीक्कलने 70 धावा ठोकल्या. डिव्हिलियर्स, मॅक्सवेलव्यतिरिक्त कोणालाही दुहेरी धावसंख्या करता आली नाही. चेन्नईकडून ड्वेन ब्रावोने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूरने 2 आणि दीपक चाहरने एका विकेट घेतली.