इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये पदार्पण करण्यासाठी अर्जुन तेंडुलकरची (Arjun Tendulkar) प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडली आहे. डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्जुन सरावा दरम्यान जखमी झाला. यामुळे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचायझीने बुधवारी सिमरजीत सिंहला (Simarjeet Singh) त्याच्या जागी संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली. मुंबई इंडियन्सने सांगितले, “मुंबई इंडियन्सने आयपीएल (IPL) 2021 च्या उर्वरित हंगामात जखमी अर्जुन तेंडुलकरच्या जागी सिमरजीतचा समावेश केला आहे. उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने आयपीएल मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनिवार्य क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर संघाबरोबर प्रशिक्षण सुरू केले आहे.” भारताचा महान फलंडनज सचिन तेंडुलकरचा 22 वर्षीय मुलगा अर्जुन अद्याप मुंबई इंडियन्ससाठी एकही खेळ खेळू शकलेला नाही. मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला लिलावात त्याच्या 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर लिलावात खरेदी केले होते. (MI Vs PBKS, IPL 2021: मुंबई इंडियन्स जिंकली! पंजाब किंग्सवर 6 विकेट्सने मिळवला विजय)
दरम्यान, अर्जुनच्या जागी मुंबईच्या ताफ्यात सामील झालेल्या सिमरजीत बाबत आता आपण जाणून घेणार आहोत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळणारा सिमरजीत सिंह हा भारताच्या श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या व्हाईट बॉल दौऱ्यात नेट गोलंदाजांपैकी एक होता. मात्र, कोविड-19 चा भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश झाल्यावर वेगवान गोलंदाजाचा टी-20 संघात समावेश करण्यात आला होता. सिमरजीतने सप्टेंबर 2018 मध्ये लिस्ट ए सामन्यात सौराष्ट्रविरुद्ध दिल्लीमध्ये पदार्पण केले. गेल्या हंगामात त्याने 28.45 च्या सरासरीने 11 विकेट्स आणि 5.65 च्या इकॉनॉमी रेटसह प्रभावी विजय हजारे ट्रॉफी हंगाम गाजवला होता. तो दिल्लीचा संयुक्त दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता.
🚨 Squad Update 🚨
Right-arm medium pacer Simarjeet Singh will be replacing Arjun Tendulkar for the remainder of #IPL2021
📰 Read all the details 👇#OneFamily #MumbaiIndians https://t.co/AcfBJsYf2w
— Mumbai Indians (@mipaltan) September 29, 2021
इतकंच नाही तर दिल्लीसाठी त्याने 10 प्रथम श्रेणी, 19 लिस्ट ए आणि 15 टी -20 सामने खेळले आहेत. सिहने 37 प्रथम श्रेणी विकेट्स, 19 लिस्ट ए विकेट्स आणि 18 टी 20 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. याशिवाय त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, चार विकेट्स आणि एकदा पाच विकेट्स, तसेच लिस्ट ए मॅचमध्ये चार विकेट्स घेतल्या आहेत. या उलट अर्जुन तेंडुलकर सय्यद मुश्ताक अली करंडकात मुंबईसाठी फक्त दोन टी-20 सामने खेळला आहे.