इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या 34 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) बलाढ्य मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) 7 विकेटने धूळ चारली. अबू धाबी येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबईने दिलेल्या 156 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात कोलकाताने 3 विकेट गमावून 15.1 ओव्हरमध्ये एकतर्फी वर्चस्व गाजवले. या विजयासह मॉर्गनच्या नाईट रायडर्सने पहिल्या टप्प्यातील पराभवाची परतफेड केली. कोलकाताच्या विजयात वेंकटेश अय्यर (Vekatesh Iyer), राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यांची निर्णायक भूमिका राहिला. अय्यरने 53 धावा केल्या तर त्रिपाठी सर्वाधिक 74 धावा करून नाबाद राहिला. तसेच शुभमन गिलने 13 धावा केल्या. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स खेळाडूंनी बॅटनंतर बॉल आणि फिल्डिंगमध्ये निराशाजनक खेळी केली. गचाळ क्षेत्ररक्षणाचा जोरदार फटका मुंबईला बसला. खेळाडूंनी अनेक महत्वपूर्ण झेल सोडले तर फिल्डर्सने धावा लुटल्या. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) वगळता अन्य खेळाडू विकेट्स घेत केकेआर (KKR) संघावर दबाव आणू शकले नाही. (MI vs KKR IPL 2021: फक्त 33 धावा करून ‘हिटमॅन’ रोहित शर्माने इतिहास रचला, रैनाला दिला धक्का; KKR विरोधात चौकारांचा ‘हा’ विक्रम करणारा बनला पहिलाच)
या सामन्यात कोलकाताचा कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. क्विंटन डी कॉक व्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याही फलंदाजांना धावांनी पन्नाशीही गाठता आली नाही. परिणामी 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावत मुंबई संघ 156 धावाच करू शकला. मुंबईने दिलेल्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात कोलकातासाठी शुभमन गिल व अय्यरची जोडी सलामीला उतरली. दोघांनी जबरदस्त फटके खेळत मुंबईवर दबाव आणला. पण बुमराहने डावातील तिसऱ्या ओव्हरमध्ये शुभमनचा अडथळा दूर केला. त्यानंतर अय्यर आणि त्रिपाठीने मुंबई गोलंदाजांची धुलाई केली आणि संघाला विजया जवळ नेले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. या दरम्यान पहिले अय्यर तर पाठोपाठ त्रिपाठीने अर्धशतकी पल्ला गाठला. कर्णधार इयन मॉर्गन 7 धावा करून परतला. तर नितीश राणाने नाबाद 5 धावा काढल्या.
दुसरीकडे, मुंबईकडून सलामीला फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि डी कॉकने 78 धावांची धमाकेदार सलामी भागिदारी रचली. मात्र अन्य फलंदाज केकेआरच्या गोलंदाजांपुढे तग धरू शकले नाही. संघ नियमित अंतराने विकेट्स गमावल्या परिणामी संघ मोठी धावसंख्या करू शकला नाही. सूर्यकुमार यादव पुन्हा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर मधल्या फळीतील इशान किशन आणि कायरन पोलार्डने काही आकर्षक शॉट मारत संघाचा धावफलक हालता ठेवला. पण लोकी फेर्ग्युसनने किशनला माघारी धाडलं. अखेरीस पुढे निर्णायक 20 व्या ओव्हरमध्ये फर्ग्युसनने सलग 2 विकेट्स घेत मुंबईला 155 धावांवर रोखले. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर पोलार्ड धावबाद झाला. तर त्यापुढील चेंडूवर कृणाल पांड्याने अय्यरच्या हातात सोपा झेल दिला.