MI vs KKR IPL 2021: फक्त 33 धावा करून ‘हिटमॅन’ रोहित शर्माने इतिहास रचला, रैनाला दिला धक्का;  KKR विरोधात चौकारांचा ‘हा’ विक्रम करणारा बनला पहिलाच
रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

MI vs KKR IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरोधात अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या 34 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा  (Mumbai Indians) नियमित कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma)पुन्हा एकदा नेतृत्वाची धुरा हाती घेतली. युएई आवृत्तीच्या पहिल्या सामन्यात रोहितला विश्रांती देण्यात आली होती. पण दुसऱ्या सामन्यात रोहितने जोरदार कमबॅक केले. क्विंटन डी कॉक सोबत रोहितने पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी करून संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. यानंतर रोहित 33 धावा करून माघारी परतला. पण या दरम्यान त्याने तीन मोठ्या विक्रमांची नोंद केली. रोहितने आयपीएलच्या  (IPL) एलिट यादीत सुरेश रैनाला (Suresh Raina) पछाडले तर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विशेष विक्रमाची नोंद करणारा पहिलाच खेळाडू ठरला. (Rohit Sharma ने रचला इतिहास, IPL मध्ये एका संघाविरुद्ध हा विक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज)

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळीदरम्यान रोहितने रैनाला मागे टाकले आणि आता तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याशिवाय, या खेळीदरम्यान चार चौकार मारताच, केकेआरविरुद्ध आयपीएलमध्ये 100 चौकार पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज बनला. रोहित शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत 5509 धावा केल्या आहेत. तर सुरेशच्या नावावर या लीगमध्ये आतापर्यंत एकूण 5495 धावा आहेत. या लीगमध्ये सर्वाधिक धावा सध्या विराट कोहलीच्या नावावर आहेत, ज्याने एकूण 6081 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, शिखर धवन 5619 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्षात घ्यायचे म्हणजे रोहितने या लीगमध्ये आतापर्यंत 208 सामन्यांमध्ये 31.66 च्या सरासरीने इतके धावा केल्या आहेत. त्याने या लीगमध्ये आतापर्यंत फक्त एक शतक केले आहे.

दुसरीकडे, या सामन्यात रोहितने आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्ध 4 चौकार मारताच 100 चौकारांचे शतक पूर्ण केले. यासह, केकेआरविरुद्ध 100 चौकार मारणारा तो पहिला फलंदाजही बनला. तसेच रोहितने या सामन्यात KKR विरुद्ध 1000 धावा पूर्ण केल्या आणि या लीगमधील कोणत्याही संघाविरुद्ध हा आकडा स्पर्श करणारा तो पहिला खेळाडू बनण्याचा मान मिळवला.