IPL 2021, KKR vs SRH: आयपीएलच्या (IPL) 14 व्या मोसमात सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) पदरी आणखी एक पराभवाची भर पडली आहे. हैदराबादचा 12 सामन्यातील हा 10 वा पराभव ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) हैदराबादने विजयासाठी 116 धावांचे सुमार लक्ष्य दिले होते . प्रत्युत्तरात केकेआरने शुभमन गिलच्या (Shubman Gill) 57 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 19.4 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून लक्ष्य गाठले. सनरायझर्सविरुद्ध या विजयासह नाईट रायडर्सने यंदाच्या प्लेऑफ शर्यतीत चौथ्या स्थानासाठी आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. केकेआरने (KKR) आतापर्यंत 13 सामने खेळले असून त्यांनी 6 सामन्यात विजयाची नोंद केली आहे. अशाप्रकारे कोलकाताने एकूण 12 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये चौथे स्थान काबीज केले आहे. केकेआरच्या विजयात शुभमनने महत्वाची भूमिका बजावली. दुसरीकडे, फलंदाजीनंतर हैदराबाद गोलंदाजीत देखील प्रभाव पाडू शकला नाही. जेसन होल्डरने दोन विकेट घेतल्या. तर सिद्धार्थ कौल व राशिद खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (IPL 2021, KKR vs SRH: आयपीएल पदार्पणात काश्मीरच्या Umran Malik याची कमाल, बनला मोसमातील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय गोलंदाज)
हैदराबादने दिलेल्या सोप्प्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात काही चांगली झाली नाही. मागील काही सामने तुफान फलंदाजी करणारा व्यंकटेश अय्यर आज स्वस्तात माघारी परतला. 8 धावांवर खेळत असताना जेसन होल्डरने त्याला झेलबाद केले. यानंतर काही धावांच्या अंतराने अय्यर पाठोपाठ राहुल त्रिपाठी देखील माघारी परतला. छोट्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर शुभमनला साथ देण्यासाठी नितीश राणा चौथ्या स्थानावर फलंदाजीला उतरला. दोघांनी संयमी फलंदाजी करून आकर्षक फटके खेळले. मोक्याच्या क्षणी सिद्धार्थ कौलने चिवट फलंदाजी करणाऱ्या शुभमनला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. मोक्याच्या क्षणी नितीश राणा खराब फटका खेळून पॅव्हिलियनमध्ये परतला. कार्तिक 18 धावा आणि कर्णधार इयन मॉर्गन 2 धाव करून नाबाद परतले. अशाप्रकारे कोलकाताने पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानासाठी आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे.
यापूर्वी नाणेफेक जिंकत हैदराबादने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. पण तो त्यांच्याच अंगी उलटला. संघातील एकाही फलंदाजाला टिकून खेळता आले नाही. परिणामी संघ अवघ्या 115 धावाच करु शकला. संघासाठी विल्यमसनने 26, प्रियम गर्ग 21 आणि अब्दुल समादने 25 धावा केल्या. याशिवाय इतर खेळाडूंना 10 हून अधिक धावा करता आल्या नाहीत. दुसरीकडे, केकेआरसाठी टिम साऊदी, शिवम मावि आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.