IPL 2021: आयपीएलमधून बाहेर पडलेल्या Adam Zampa चे वादग्रस्त विधान, म्हणाला- ‘आयपीएलसाठी तयार केलेले बायो-बबल सर्वात असुरक्षित’
अ‍ॅडम झांपा (Photo Credit: Twitter)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 साठी तयार केलेले बायो-बबल असुरक्षित असल्याचे ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अ‍ॅडम झांपाने (Adam Zampa) म्हटले आहे. झांपा आणि त्याचा सह ऑस्ट्रेलियन गोलंदाज केन रिचर्डसनने (Kane Richardson) आयपीएलच्या 14च्या मोसमातून माघार घेतली आहे आणि वैयक्तिक कारणांमुळे दोघे मायदेशी परतले आहेत. विशेष म्हणजे दोघे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघातून यंदा आयपीएलसाठी भारतात दाखल झाले होते. झांपाला एकीकडे यंदा एकही सामना खेळता आला नाही तर रिचर्डसन एक आरसीबीसाठी (RCB) एक सामना खेळला होता ज्यामध्ये त्याने एक विकेट काढली. झांपाने सिडनी मॉर्निंग हेराल्डला सांगितले की, “आम्ही काही (बबल) मध्ये आहोत आणि मला वाटते की हे बहुधा सर्वात असुरक्षित आहे.” तो म्हणाला की, ही स्पर्धा संयुक्त अरब अमीरातमध्ये (युएई) खेळली जावी जशी मागील वर्षी झाले. (IPL 2021: कोरोनाचे संकट! डेव्हिड वार्नर, स्टिव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू आयपीएलमधून माघार घेण्याची शक्यता)

झांपा म्हणाला , “ही स्पर्धा भारतात खेळली जात आहे, यामुळे जास्त भीती आहे. नेहमीच स्वच्छता आणि अधिक सुरक्षा ठेवण्यासाठी आम्हाला येथे सांगितले गेले आहे. मला हे सर्वात विचित्र वाटले आहे. मला असे वाटते की भारताचा बायो बबल सर्वाधिक असुरक्षित आहे.” त्याने पुढे म्हटले की, “सहा महिन्यांपूर्वी दुबईत झालेला आयपीएल असा नव्हता. मला वाटते की तो जास्त सुरक्षित होता. वैयक्तिकरित्या, माझे असे मत आहे की यंदाही आयपीएल तिथे असायला हवे होते, परंतु त्यात बहुतेकदा राजकारण इत्यादींचा समावेश असतो.”

दुसरीकडे, झांपा आणि रिचर्डसनला वगळता इतर अनेक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू देखील भीतीपोटी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधून बाहेर पडण्याच्या विचारात आहेत. भारतात वाढत्या कोविड-19 प्रकरणा दरम्यान ते आपल्या देशात प्रवेश करू शकणार नाहीत अशी भीती त्यांना सतावत आहे. जंपा पुढे म्हणाले की, पुढील चर्चा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा घ्यावी की नाही याबद्दल होईल. ते म्हणाले, “अर्थातच यावर्षी टी-20 विश्वचषकही भारतात होणार आहे. कदाचित क्रिकेट विश्वात पुढील चर्चा यावर असेल, परंतु सहा महिने बराच काळ आहे आणि मग कदाचित भारताची परिस्थिती चांगली होईल.”