नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी (Photo Credit: Twitter/@IPL)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या सत्राच्या सुरुवातीच्या काळात जवळजवळ संपूर्ण क्रिकेट विश्वाला वेड लावले आहे. यंदाच्या हंगामाचा पहिला सामना 9 एप्रिल रोजी आयपीएलचे (IPL) गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. अगदी रोमांचक ठरलेल्या सामन्यात आरसीबीने (RCB) बाजी मारली आणि मुंबईवर मात करत आयपीएलची विजयी सुरुवात केली. या सामन्यात अनुभवी भारतीय खेळाडूं व्यतिरिक्त युवा  व नवख्या खेळाडूंनी देखील चमकदार कामगिरी बजावली. आयपीएलचे आजवर सहा सामने झाले असून काही युवा भारतीय खेळाडूंनी आपल्या दमदार बॅटिंग व बॉलिंगच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले. आज आपण अशाच काही खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्या प्रतिभेच्या जोरावर टीम इंडियामधील (Team India) स्थानावर दावा ठोकू शकतात.

हर्षल पटेल (Harshal Patel)

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 विकेट घेणारा हरियाणाचा हर्षल या यादीत आघाडीवर आहे. अष्टपैलू पटेलने आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. पटेलने मुंबईविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या, तर हैदराबादविरुद्ध निर्णायक क्षणी दोन गडी बाद केले. पटेलमध्ये एक चांगला अष्टपैलू क्रिकेटर बनण्याची क्षमता असून त्याने आपली कामगिरी अशीच सुरु ठेवल्यास तो लवकरच टीम इंडियामध्ये संधी निर्माण करू शकतो.

दीपक हुड्डा (Deepak Hooda)

घरगुती क्रिकेटमध्ये बडोदा क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या 25 वर्षीय दीपक हुड्डाने मोसमातील पहिल्या सामन्यात फलंदाजी करत केवळ 28 चेंडूत 64 धावांची स्फोटक अर्धशतकी खेळी केली. हुड्डाने आपल्या सर्वोत्कृष्ट खेळीदरम्यान अनेक आकर्षक मोठे शॉट्स देखील लगावले जे पाहून सर्वच चकित झाले. अशा परिस्थितीत हुड्डाची आक्रमक कामगिरी कायम राहिल्यास तो लवकरच संघात जागेसाठी दावा ठोकू शकतो.

चेतन सकारिया (Chetan Sakariya)

राजस्थान रॉयल्सचा 22 वर्षीय युवा चेतन सकारियाने आयपीएलमध्ये पदार्पण सामन्यात आपल्या गोलंदाजीने प्रत्येकाला प्रभावित केले आहेत. सकारियाने पंजाबविरुद्ध ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ते पाहून, तो भारतीय संघाकडून खेळताना दिसेल असे दिसत आहे.

नितीश राणा (Nitish Rana)

कोलकाता नाईट रायडर्सचा ओपनर नितीश राणाने पहिल्या दोन्ही सामन्यात शानदार बॅटिंगचे प्रदर्शन करत विरोधी संघावर वर्चस्व गाजवले आहे. राणाने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात जबरदस्त अर्धशतकी खेळी केली आणि पहिल्या सामन्यात संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. राणा आघाडीच्या फळीत संघासाठी फायदेशीर ठरू शकतो आणि टीम इंडियामध्ये त्याची निवड झाल्यास भारतीय संघाची फलंदाजी आणखी मजबूत होईल.