अनेक दिवसांच्या अनुमान आणि शक्यतांनंतर, दोन प्रमुख क्रिकेट बोर्डाने त्यांच्या खेळाडूंच्या उर्वरित आयपीएल (IPL) 2021 हंगामासाठी उपलब्धतेची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) औपचारिकरित्या कळवले आहे की त्यांना त्यांच्या खेळाडूंना संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आयपीएलमध्ये भाग घेण्यास हरकत नाही. बीसीसीआयने दोन्ही मंडळांकडून पूर्ण सहकार्याची माहिती फ्रँचायझींना दिल्यानंतर याची पुष्टी झाली आहे. व्यस्त आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमुळे परदेशी खेळाडूंच्या सहभागाबाबत अनिश्चितता होती. मात्र, आता ऑस्ट्रेलिया व इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या खेळाडूंना हिरवा कंदील दिला आहे. (DC प्रशिक्षक रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दिला गुरु मंत्र, टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम)
आयपीएल COO हेमांग अमीन यांनी शुक्रवारी प्रत्येक फ्रँचायझीला बोलावून दोन्ही मंडळांच्या निर्णयाची माहिती दिली होती आणि आता खेळाडूंना स्पर्धेत भाग घ्यायचा आहे की नाही यावर अवलंबून आहे. हेमांगने फ्रँचायझींना असेही सांगितले आहे की हे खेळाडू स्पर्धेच्या शेवटपर्यंत उपलब्ध असतील. “आम्हाला आयपीएल कार्यालयाकडून फोन आला आहे आणि आम्हाला कळवण्यात आले आहे की बोर्डांना त्यांच्या खेळाडूंच्या सहभागावर आक्षेप नाही. हे आता खेळाडूंवर अवलंबून आहे,” चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी क्रिकबझला सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, “आमचे ऑस्ट्रेलियन आणि इंग्लिश खेळाडू (जेसन बेहरनडोर्फ, सॅम कुरान, मोईन अली) उपलब्ध आहेत.” यापूर्वी, न्यूझीलंड क्रिकेट प्रमुख डेविड व्हाइटने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी देशातील खेळाडूंच्या उपलब्धतेची पुष्टी केली होती. बहुसंख्य परदेशी खेळाडू सहभागी होत असल्यामुळे आयपीएल फ्रँचायझींनी आता सुटकेचा श्वास घेतला असेल.
The boards have informed BCCI of their decision to allow their players to go for #IPL2021. It is now upto the players to decide on their participation. @vijaymirror reports
— Cricbuzz (@cricbuzz) August 14, 2021
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ब्लॉकबस्टर लढाईसह 19 सप्टेंबरपासून आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, अर्धी स्पर्धा आधीच झाली आहे आणि 31 सामने शिल्लक आहेत. म्हणूनच, आता उर्वरित स्पर्धा कशी पार पडते हे पाहणे मनोरंजक असेल. दुसरीकडे, उल्लेखनीय आहे की विश्वनाथन संघाच्या 12 खेळाडूंसह आधीच दुबईला पोहोचले आहेत.