चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या समापन सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सना (Kolkata Knight Riders) 27 धावांनी लोळवलं आणि चौथे आयपीएल (IPL0 विजेतेपद काबीज केले. चेन्नईच्या विजयात फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) आणि गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. सीएसकेने (CSK) पहिले फलंदाजी करून 193 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात केकेआर फलंदाजांच्या ‘फ्लॉप शो’मुळे निर्धारित 20 ओव्हरमध्ये 165 धावाच करू शकले. कोलकातासाठी सलामीवीर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी अर्धशतकी पल्ला गाठला. पण अन्य फलंदाजांच्या आयपशामुळे संघाला जेतेपदाच्या सामन्यात मोठा पराभव पत्करावा लागला. शुभमनने 51 धावा तर अय्यरने 50 धावा ठोकल्या. यांच्याशिवाय अन्य खेळाडू मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. दुसरीकडे, चेन्नईचे गोलंदाज पुन्हा एकदा विरोधी संघावर तुटून पडले. शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजा आणि जोश हेजलवूडने 2 गडी बाद केले. तसेच दीपक चाहर आणि ड्वेन ब्रावोने एक गडी बाद केला. (IPL 2021 Final: केएल राहुलला पछाडून रुतुराज गायकवाडने काबीज केली Orange Cap, इतक्या धावांनी फाफ डु प्लेसिसच्या हातून निसटली)

केकेआरने टॉस जिंकून चेन्नईला फलंदाजीला बोलावले, पण तो निर्णय त्यांच्याच अंगी आला. डु प्लेसिस चे तडाखेबाज अर्धशक आणि मोईन अलीच्या फटकेबाजीच्या बळावर संघाने 192 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तर व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल कोलकातासाठी सलामीला उतरले. या दोघांच्या अर्धशतकी खेळीने केकेआरला दमदार सुरुवात करून दिली. यादरम्यान पहिलंच पर्व खेळणाऱ्या अय्यरने 31 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार खेचत चौथं अर्धशतक ठोकलं. त्यानंतर गिलने जाडेजाच्या 10 व्या षटकात ठोकलेला उत्तुंग चेंडू अंबाती रायडूने पकडलं पण चेंडू मैदानावर असलेल्या स्पायडर कॅमला लागल्याने बॉल अवैध पकडून त्याला नाबाद करार देण्यात आलं आणि त्याला जीवदान मिळालं. केकेआरने उत्तम सुरुवात केल्यानंतर आता मात्र त्यांचे खेळाडू एकामागोमाग एक बाद होत गेले. ठाकूरने अय्यरला बाद करून संघाला सावरलं. त्याच षटकात त्याने नितीश राणाला पहिल्याच चेंडूवर माघारी धाडलं.

पुढच्याच षटकात सुनील नारायणही 2 धावा करुन बाद झाला. नुकतचं अर्धशतक पूर्ण झालेला शुभमन मोठा शॉट खेळताना बाद झाला. दिनेश कार्तिकही खास कमाल करु शकला आणि जडेजाने त्याला 9 धावांवर बाद केलं. जडेजानंतर शाकिब अल हसनला शून्यावर पायचीत करून कोलकाताच्या अडचणीत वाढ केली. यानंतर राहुल त्रिपाठी आणि इयन मॉर्गन देखील सलग ओव्हरमध्ये पॅव्हिलियनमध्ये परतले व चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.