रोहित शर्मा-एमएस धोनी (Photo Credit: Getty)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा दुसरा टप्पा दुबईमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील ब्लॉकबस्टर सामन्याने सुरु होणार आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे 2 मे रोजी आयपीएल (IPL) 2021 स्थगित करण्यात आले होते. आणि आता 140 दिवसांनंतर दुसरा टप्पा रविवारी यूएईमध्ये सुरु होणार आहे. भारतात खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात 29 सामने खेळले गेले, तर उर्वरित 31 सामने यूएईमध्ये खेळले जातील. सीएसके विरुद्ध मुंबई सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. पाच वेळचा चॅम्पियन रोहित शर्माचा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. स्पर्धेतील सर्वात कठीण लढत मुंबई आणि एमएस धोनीच्या (MS Dhoni) सीएसके यांच्यात पाहायला मिळते. आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात हे दोन्ही संघ जेव्हा अखेच्या वेळी आमनेसामने आले होते, तेव्हा मुंबईने सामना 4 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला होता. (IPL 2021, CSK vs MI: आयपीएल सुरु होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला फटका बसू शकतो, मुंबईविरुद्ध स्टार अष्टपैलू बेंचवर बसण्याची शक्यता)

MI विरुद्ध CSK च्या आजच्या सामन्यात जर चेन्नईने सामना जिंकला तर त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्स 12 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे आणि चेन्नईचे 10 गुण आहेत परंतु CSK चा नेट रनरेट चांगला आहे. तसेच रोहित शर्माची पलटन विजयी झाल्यास मुंबईचा संघ तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला खाली ढकलेल. मुंबईचे सध्या 8 गुण आहेत. लक्षात घेण्याचे म्हणजे गेल्या 9 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्जचा 7 वेळा पराभव करण्यात यशस्वी ठरली आहे. पण जेव्हा दुबईत आयपीएल 2020 मध्ये हे दोन संघ शेवटच्या वेळी भिडले, तेव्हा सीएसकेने 5 गडी राखून मुंबईवर मात केली होती. त्याचप्रमाणे आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि चेन्नई एकूण 31 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई 19 वेळा यशस्वी झाला आहे, तर धोनीची ‘येलो आर्मी’ केवळ 12 वेळा जिंकू शकली आहे.

दुसरीकडे, सध्याच्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर धोनी आणि कंपनी आघाडीवर आहेत. चेन्नई सुपर किंग्सने पहिल्या हाफमध्ये खेळलेल्या 7 पैकी 5 मॅच जिंकल्या आहेत. अशा प्रकारे तो 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने 7 सामन्यांत 4 सामने जिंकले आहेत आणि चौथ्या स्थानावर आहेत.