MI vs CSK, IPL 2021: कोरोनाच्या संकटामुळे मधेच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा हंगाम पुन्हा सुरु होणार आहे. पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात स्पर्धेच्या पहिल्या सामन्याने दुसऱ्या टप्प्याचा ‘श्रीगणेश’ होईल. या सामन्यात एकीकडे गेल्या वेळी युएई येथे जेतेपद पटकावल्याने मुंबई इंडिअन्सचा आत्मविश्वास वाढला असेल तर दुसरीकडे, तीन वेळा चॅम्पियन सीएसके (CSK) देखील विजयासह त्यांचे चौथे आयपीएल जेतेपदाच्या शोधात असतील. तथापि, दिग्गज कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातील चेन्नईसाठी रस्ता खडतर असणार आहे कारण त्यांचा स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) या सामन्यातून बाहेर बसू शकतो. यामागील मोठे कारण ब्रावोच्या पाठीची दुखापत आहे आणि यामुळे ब्रावो कॅरिबियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात देखील गोलंदाजी करू शकला नव्हता. अशास्थितीत त्याची दुखापत पाहता, चेन्नई त्याला फलंदाज म्हणून संघात समाविष्ट करते की नाही हे पाहणे मनोरंजक असेल. (IPL 2021: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या आजच्या सामन्याआधी जाणून घ्या दोन्ही संघातील महत्वाची माहिती)
दुसरीकडे, ब्रावो व्यतिरिक्त सीएसके सलामीवीर फाफ डू प्लेसिसच्या दुखापतीमुळे देखील धोनी ब्रिगेडचे टेंशन वाढले असेल. ड्यु प्लेसिस सराव सत्रांमध्ये अधिक चांगला दिसत असला तरी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यासाठी त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याबाबत निर्णय सामन्यापूर्वी घेतला जाईल. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो यलो ब्रिगेडच्या वरिष्ठ खेळाडूंपैकी एक आहे आणि जगभरात टी-20 क्रिकेट खेळण्याचा त्याला मोठा अनुभव आहे. तसेच ब्रावोच्या अनुपस्थितीत चेन्नईच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे तर सॅम कुरन बुधवारीच दुबईला पोहोचला आहे आणि तो सहा दिवस क्वारंटाईन राहणार आहे. अशा स्थितीत त्याचे पहिल्या सामन्यात खेळणे कठीण आहे. धोनी कुरनच्या जागी जोश हेजलवूडचा संघात समावेश करू शकतो. हेझलवूडने गेल्या काही आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. याशिवाय दीपक चाहरला पॉवर-प्लेमध्ये आपले काम पार पाडणे चांगले माहीत आहे. इंग्लंडच्या भूमीवर छाप पाडणारा शार्दुल ठाकूर दिपकला साथ देताना दिसेल.
एकूणच आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात चेन्नईने धोनीच्ये नेतृत्वात धमाकेदार पुनरागमन केले. गेल्या आयपीएलमध्ये प्ले-ऑफ फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या सुपर किंग्सने भारतात आयोजित पहिल्या टप्प्यात गुणतालिकेत दुसरा क्रमांक गाठला. चेन्नईने खेळलेल्या सात पैकी 5 सामने जिंकले आणि दोन गमावले. अशा स्थितीत सीएसके यंदा अंतिम-4 मध्ये स्थान मिळवण्यापासून फक्त काही पावले दूर आहे.