IPL 2021: आयपीएलच्या सर्वात महागड्या खेळाडूवर सुनील गावस्कर संतापले, म्हणाले- ‘16 कोटी घेऊनही अपेक्षेवर...’
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: Twitter/@IPL)

माजी आयपीएल चॅम्पियन राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) आणखी एक हंगाम खराब ठरला. सलग तीन पराभवानंतर राजस्थान संघ आयपीएल (IPL) 20021 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी संघाला गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध शेवटचा सामना जिंकणे गरजेचे होते, पण संघ फक्त 85 धावांवर ढेर झाला आणि त्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थानमधील तीन खेळाडू त्यांचे खातेही उघडू शकले नाही. यामध्ये यशस्वी जयस्वाल अनुज रावत आणि स्टार अष्टपैलू क्रिस मॉरिसचा (Chris Morris) समावेश आहे. मॉरिसला राजस्थानने यंदाच्या लिलावात 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले असून तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होता, पण आयपीएल 2021 मध्ये तो राजस्थानसाठी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने या मोसमात 11 सामन्यांमध्ये फक्त 67 धावा केल्या आहेत आणि 15 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मॉरिसच्या खराब कामगिरीबद्दल फटकारले आहे. (IPL 2021, KKR vs RR: केकेआर ‘जितबो रे’! राजस्थान फलंदाज भुईसपाट, शारजाहात कोलकाताचा 86 धावांनी मोठा विजय)

गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले, “जेव्हा राजस्थानने त्याला निवडले तेव्हा त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि मला माहित आहे की त्या अपेक्षांवर खरे उतरणे नेहमीच शक्य नसते. तो फक्त त्या क्रिकेटपटूसारखा आहे ज्याने नेहमीच वचन दिले आहे परंतु त्याच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत क्वचितच प्रभावी खेळी केली आहे. हे फक्त या आयपीएल बद्दल नाही. जेव्हा तो दक्षिण आफ्रिकेसाठी खेळला, त्यावेळी खूप अपेक्षा होत्या, पण तो अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही.” मुख्यतः संयमाच्या अभावामुळे मॉरिस आपली पूर्ण क्षमता वापरू शकला नाही, असे मत गावस्कर यांनी मांडले आहे. ते पुढे म्हणाले, “कदाचित फिटनेस किंवा स्वभावाचे प्रश्न असतील कारण अनेकदा तुमच्याकडे प्रतिभा असते पण स्वभाव नसतो आणि ते तुम्हाला मदत करत नाही. तुम्ही विचित्र खेळांमध्ये यशस्वी होऊ शकता पण जर तुम्हाला सातत्याने यशस्वी व्हायचे असेल तर तुमचा स्वभाव आणि प्रतिभा जुळली पाहिजे.”

राजस्थान रॉयल्सच्या लीग टप्प्याच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे तर कोलकाताने पहिले फलंदाजी करताना 4 गडी गमावून 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघ 16.1 षटकांत ढेर झाला आणि त्यांच्या फलंदाजांनी केवळ 85 धावा केल्या. या पराभवासह त्याचा आयपीएल 2021 चा प्रवासही संपुष्टात आला.