IPL: आयपीएलच्या एका ओव्हरमध्ये ‘या’ 5 दिग्गजांनी चोपल्या सर्वाधिक धावा, मैदानात उडवली गोलंदाजांची दाणादाण
पॅट कमिन्स (Photo Credit: PTI)

Most Runs in One Over in IPL: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium( 21 एप्रिल रोजी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील रोमांचक सामन्यात पॅट कमिन्सने सीएसकेचा (CSK) वेगवान गोलंदाज सॅम कुरनला (Sam Curran) एका ओव्हरमध्ये 30 धावा चोपल्या. केकेआरच्या डावात अखेरपर्यंत नाबाद राहिलेला कमिन्स संघासाठी विजय मिळवू शकला नसला तरी त्याने एका विक्रमला नक्कीच गवसणी घातली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावांचा हा रेकॉर्ड आहे ज्यामध्ये आता कमिन्सने दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहेत. आयपीएलमध्ये (IPL) आजवर अनेक आक्रमक फलंदाजांनी आपल्या बॅटने एका ओव्हरमध्ये गोलंदाजाची शाळाच घेतली आणि रेकॉर्ड धावा लुटल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये 3 भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. (IPL: ‘या’ 5 भारतीय गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक नो बॉल, पहिले नाव जाणून बसेल धक्का)

1. क्रिस गेल (Chris Gayle)

आयपीएलमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गेल आघाडीवर आहे. ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये प्रसिद्ध गेलचा हा रेकॉर्ड 2011 पासून अबाधित आहे. गेलने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर कोची टस्कर्स केरळाविरुद्ध एका ओव्हरमध्ये 36 धावा काढत हा रेकॉर्ड कायम केला होता.

2. सुरेश रैना (Suresh Raina)

या यादीत चेन्नई सुपर किंग्सचा चिन्ना थाला, सुरेश रैना पहिला भारतीय फलंदाज आहे. रैनाने 2014 मध्ये पंजाब किंग्स (तेव्हा किंग्स XI पंजाब) विरोधात वानखेडे स्टेडियमवर 32 धावा लुटल्या होत्या.

3. विराट कोहली (Virat Kohli)

रैनानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली या एलिट यादीत दुसरा मोठा भारतीय फलंदाज आहे. विराटसाठी 2016 एक विशेष वर्ष सिद्ध झाले होते आणि याच दरम्यान त्याने गुजरात लायन्स विरोधात एका ओव्हरमध्ये 30 धावा काढत कमाला कामगिरीची नोंद केली.

4. पॅट कमिन्स (Pat Cummins)

फलंदाजांच्या या एलिट यादीत सामील होणार कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज कमिन्स लेटेस्ट खेळाडू आहे.कमिन्सने सॅम कुरनने टाकलेल्या 16 व्या ओव्हरमध्ये 1 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने तब्बल 30 धावा काढल्या.

5. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)

भारताचा माजी सलामी फलंदाज सेहवागने आयपीएलमध्ये देखील आपली छाप पडली आहे. 2008 मध्ये आयपीएलच्या एका ओव्हरमध्ये सेहवागने 30 धावा चोपल्या होत्या. आपल्या या रेकॉर्ड-ब्रेक खेळीत सेहवागने 3 चौकार आणि तितकेच षटकार ठोकले होते.

सेहवागशिवाय आयपीएलमध्ये एका षटकात 30 धावा करण्याचा विक्रम गेल, राहुल तेवतिया आणि शॉन मार्श यांच्याही नावावर आहे. तेवतियाने पंजाब विरुद्ध तर मार्शने बेंगलोर विरोधात हा कारनामा केला होता.