IPL 2021: युएईमध्ये आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची BCCI ने केली घोषणा, जाणून घ्या नवीन वेळापत्रक
आयपीएल (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) होणाऱ्या आयपीएल (IPL) 2021 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. युएईमध्ये (UAE) 27 दिवसांच्या कालावधीत एकूण 31 सामने खेळले जातील. भारतातील कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे आयपीएलच्या 14 व्या सत्राला मध्यभागीच स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सामने युएईमध्ये खेळले जाणार असल्याची घोषणा केली. बीसीसीआयच्या नव्या वेळापत्रकानुसार आयपीएल हंगामातील उर्वरित भाग 19 सप्टेंबर रोजी दुबई येथे चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सलामीच्या सामन्याने सुरु होईल. यानंतर सामना अबू धाबी येथे जाईल, जेथे कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी होईल. 24 सप्टेंबर रोजी शारजहा पहिला सामना होईल. या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होईल.

बीसीसीआयच्या नवीन वेळापत्रकानुसार दुबई येथे 13 सामने तर  दहा शारजाहमध्ये आणि आठ सामने अबू धाबी येथे होणार आहेत. सात डबल हेडर होणार आहेत. यामध्ये पहिल्या सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता होईल तर संध्याकाळी होणारे सामने 7:30 वाजता सुरु होतील. तसेच साखळी फेरीतील अंतिम सामना 8 नोव्हेंबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. पहिला क्वालिफायर सामना 10 ऑक्टोबरला दुबईमध्ये तर एलिमिनेटर व क्वालिफायर 2 शारजाह येथे अनुक्रमे 11 व 13 ऑक्टोबरला खेळला जाईल. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी दुबई येथे आयोजित केला जाणार आहे.

आयपीएलच्या सध्याच्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल पहिल्या स्थानावर आहेत. नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत रिषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीने आतापर्यंत 8 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत. दरम्यान, गुणतालिकेत दिल्लीपाठोपाठ चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि तळाशी सनरायझर्स हैदराबाद संघ आहे.