IND vs SA ODI 2022: मैदानात Rishabh Pant सोबत झाली ‘तू तू मै मै’, फोटो शेअर करून दक्षिण आफ्रिकी गोलंदाजाने लिहिले- ‘...पण कधीही सीमा ओलांडू नको’
तबरेज शम्सी आणि रिषभ पंत (Photo Credit: Twitter)

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलच्या भारताला (India) 7 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने  (Rishabh Pant) भारताकडून सर्वाधिक धावा चोपल्या आणि पंतने 71 चेंडूंत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 85 धावांची शानदार खेळी खेळली. डावखुरा फलंदाज पंत दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi) विरुद्ध आक्रमक दिसला आणि त्याने त्याच्याविरुद्ध 26 चेंडूंत पाच चौकार आणि एक षटकार ठोकला. मात्र, अखेर शम्सीने पंतला आपला शिकार बनवले. उभय संघांमधला तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज, रविवारी केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात पंतला बाद करणारा फिरकी गोलंदाज शम्सीने भारतीय फलंदाजासोबतचा फोटो शेअर करून त्याला खास संदेश दिला. (IND vs SA 2nd ODI: सामन्यासह KL Rahul आणि ब्रिगेडने मालिका गमावली, भारतीय गोलंदाजांचा ‘फ्लॉप शो’ सुरूच; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत 2-0 अजेय आघाडी)

पंत त्याच्या आक्रमक फलंदाजीसोबतच मैदानात आक्रमक वृत्तीसाठी देखील ओळखला जातो. त्याची रसी व्हॅन डर डुसे सोबतची स्लेजिंग कसोटी मालिकेत चर्चेचा विषय ठरली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनीही पंतची खरडपट्टी काढली आणि त्याला चुकीचे फटके खेळण्यास भाग पाडले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शम्सीने पंतला बाद केले पण त्याआधी पंतने शम्सीच्या चेंडूंवर जोरदार फटकेबाजी केली. आफ्रिकेचा फिरकीपटू 33 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पंतला बाद करण्यात यशस्वी ठरला. पंतने शम्सीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण एडन मार्करमने त्याचा झेलबाद पकडला. शनिवारी शम्सीने पंतसोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि ट्विट केले की, “मेहनत करा... छान खेळा... पण कधीही मर्यादा ओलांडू नका.”

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील तिसऱ्या व अंतिम वनडे सामन्याबद्दल बोलायचे तर भारताचा प्रभारी कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून आफ्रिकी संघाला पहिले फलंदाजीला बोलावले. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल झाले आहे तर यजमान संघाने शम्सीच्या जागी ड्वेन प्रिटोरियसचा समावेश केला आहे. यजमान संघ मालिकेत 2-0 ने अजेय आघाडीवर असून त्यांच्याकडे भारताला क्लीन स्वीप करण्याची मोठी संधी आहे.