IND vs NZ WTC Final 2021: फायनल सामन्यात Virat Kohli ने लावला पंजाबी तडका, सोशल मीडियावर व्हायरल होतोय जबराट डान्सचा Video
विराट कोहली भांगडा डान्स (Photo Credit: Twitter)

ICC WTC Final 2021: न्यूझीलंड (New Zealand) विरोधात टीम इंडिया (Team India) कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट शांत राहिली असली तरी साउथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाउल (Hampshire Bowl) येथे फिल्डिंग करताना भारतीय कॅप्टनने आपल्या डान्स मूव्हजने मात्र मायदेशी आणि स्टेडियमवर उपस्थित चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. काईल जेमीसनच्या पाच विकेटच्या जोरावर किवी संघाने भारताचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला. टीम इंडियासाठी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली तर विराटने छोटेखानी 44 धावांचे योगदान दिले. त्यांनतर किवी संघाकडून टॉम लाथम आणि डेव्हन कॉनवेची जोडीने डावाची सुरुवात केली. यादरम्यान स्टेडियमवर आलेल्या भारत आर्मीच्या (Bharat Army) ढोलच्या तालाने विराटला देखील थिरकण्यास भाग पाडले. विराटने सामन्यात पंजाबी तडक लावला आणि सामना सुरु असतानाच मैदानात काही भांगडाचे काही स्टेप्स केल्या. (IND vs NZ WTC Final 2021: विराट कोहलीला चिअर करण्यासाठी भारत आर्मीने गायले गाणे, व्हायरल Video पाहून तुम्हीही थिरकाल)

न्यूझीलंडच्या डावाच्या सुरुवातीचा हा व्हिडिओ असून सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. दुसरीकडे, विराट हा क्रिकेटमधील असा खेळाडू आहे जो मैदानावर क्वचितच आपल्या भावना व्यक्त करण्यापासून मागे राहतो. यापूर्वी देखील विराटला सामना सुरु असताना चाहत्यांसोबत जयघोष किंवा त्यांच्यासोबत थिरकताना दिसला होता. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडिया माफक 217 धावसंख्येवर ऑलआऊट झाली आहे. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत काईल जेमिसन चमकला. जेमीसनने पाच भारतीय फलंदाजांना माघारी धाडलं. त्याच्याव्यतिरिक्त नील वॅग्नर आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 2 आणि टीम साऊथीने 1 विकेट घेतली. दुसरीकडे, भारतासाठी रहाणे आणि कोहलीव्यतिरिक्त रोहित शर्मा 34, शुबमन गिल 28 आणि आर अश्विनने 22 धावांचे योगदान दिले.

भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट टीममध्ये 18 ते 22 जूनदरम्यान कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना रांगणार होता पण पहिला दिवस पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेला ज्यामुळे आता 23 जून, जो आयसीसीकडून राखीव दिवस ठेवण्यात आला होता त्या दिवसापर्यंत सामना खेळला जाईल. साउथॅम्प्टन येथील पावसाळी हवामान लक्षात घेत ICC ने अंतिम सामन्यापूर्वीच हा निर्णय घेतला होता. तसेच जर राखीव दिवसापर्यंत सामन्याचा निकाल लागला नाही म्हणजे जर सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाईल.