अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

ICC WTC Final 2021: अंधुक प्रकाशामुळे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघातील सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ स्थगित करण्यात आला आहे. तत्पूर्वी भारतीय संघाने (Indian Team) 3 बाद 146 धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 44 आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 29 धावा करून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट-रहाणेने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) फायनल सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलने डावाची सुरुवात केली. रोहितने 34 आणि शुभमनने 28 धावा केल्या. दुसरीकडे, किवी गोलंदाजांनी शानदार बॉलिंग करत भारतीय फलंदाजांना अडचणीत पाडले. टिम साउदी, नील वाग्नर, ट्रेंट बोल्ट आणि काईल जेमीसन यांनी पहिल्या दिवशी प्रत्येकी 1 विकेट काढली. (IND vs NZ ICC WTC Final 2021: विराट कोहली विरोधात पंचांच्या रिव्यूमुळे उडाला गोंधळ, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण)

भारताकडून शुभमन आणि रोहितच्या जोडीने चांगली सुरुवात करुन दिली मात्र दोघेही काही वेळातच बाद झाले. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी झाली पण दोन्ही सलामी फलंदाज चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करू शकले नाही. जेमीसन भारताला 20 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर पहिला झटका दिला आणि रोहितला साउदीकडे झेलबाद केले. रोहितनंतर 24 व्या ओव्हरमध्ये सेट फलंदाज शुभमन देखील झेलबाद झाला. वाग्नरच्या गोलंदाजीवर विकेटकीपर बी.जे. वॅटलिंगने गिलचा शानदार झेल पकडला. त्यानंतर कसोटी तज्ञ पुजाराला किवी गोलंदाजांपुढे खाते उघडण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. पुजाराने तब्बल 36 बॉल खेळल्यानंतर वॅगेनरच्या चेंडूवर चौकार खेचत खाते उघडले. अखेर संयमी खेळी करणाऱ्या पुजाराला अनुभवी बोल्टने पायचीत करत माघारी धाडले.

दरम्यान, आजपासून सुरु झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी किवी संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकीपटूचा समावेश न करता पाच वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. दुसरीकडे, टीम इंडियामध्ये रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे अनुभवी स्पिन गोलंदाज आहेत. भारताने सामन्यापूर्वीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती.