Gautam Gambhir (Photo Credit - X)

Border–Gavaskar Trophy:  बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची सुरुवात भारतासाठी चांगली झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान पर्थ येथे खेळला गेला. पर्थ कसोटी सामना 295 धावांनी जिंकण्यात भारताला यश आले. यानंतर भारताचा दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. जो दिवस-रात्र कसोटी सामना आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतल्याची बातमी समोर आली आहे. (हेही वाचा  -  IND vs AUS 2nd Test: दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात कोणताच बदल नाही)

प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात का परतले?

पर्थ कसोटीतील शानदार विजयानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर 'वैयक्तिक कारणांमुळे' मंगळवारी भारतात परतत आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ॲडलेडमध्ये 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी गंभीर पुन्हा संघात सामील होणार आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "गंभीरने आम्हाला सांगितले आहे की तो वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतत आहे. बोर्डाने त्याची विनंती मान्य केली आहे. तो दुसऱ्या कसोटीपूर्वी संघात परतणार आहे."

टीम इंडिया विरुद्ध पंतप्रधान इलेव्हन सराव सामना

भारतीय संघ बुधवारी कॅनबेराला रवाना होईल, जिथे 30 नोव्हेंबरपासून पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय गुलाबी चेंडूचा सराव सामना खेळेल. यावेळी, गंभीरच्या अनुपस्थितीत, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि रायन टेन डोशेट, गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप कर्णधार रोहित शर्मासह संघाची जबाबदारी सांभाळतील.

रोहित शर्मा संघात परतला

दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे पहिली कसोटी खेळू न शकलेला कर्णधार रोहित शर्मा रविवारी ऑस्ट्रेलियाला पोहोचला. पर्थ कसोटीच्या चौथ्या दिवशी तो गंभीरसोबत ड्रेसिंग रूममध्ये दिसला. रोहितने लंच ब्रेकमध्ये गुलाबी चेंडूने नेटमध्ये जोरदार सरावही केला.