कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) आयपीएल (IPL) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे, त्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमींची निराशा झाली आहे. परंतु यादरम्यान एक अशी बातमी आली आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकेल. भारतीय महिला क्रिकेट संघाने (India Women's Cricket Team) वर्ल्ड कप 2021 (Women's Cricket World Cup 2021) साठी आपले स्थान निश्चित केले आहे. 50 षटकांचा हा विश्वचषक पुढील वर्षी 6 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान न्यूझीलंडमध्ये खेळला जाणार आहे. विश्वचषकात स्थान मिळवण्याचा टीम इंडियाचा निर्णय आयसीसी महिला चॅम्पियनशिप समितीने घेतला आहे. भारताव्यतिरिक्त न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ देखील यामध्ये सामील आहेत.
आयसीसी विश्वचषक पात्रता सामने यावर्षी 3 ते 19 जुलै दरम्यान श्रीलंकेत खेळला जाणार होते, तेथे श्रीलंका, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, बांगलादेश, आयर्लंड, थायलंड, झिम्बाब्वे, पापुआ न्यू गिनी, अमेरिका आणि नेदरलँड्स सहभागी होणार होते. परंतु कोरोना कोरोना व्हायरसचा उद्रेक पाहता ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता या वर्ल्डकपसाठी भारतासोबतच इतर चार संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. (हेही वाचा: IPL 2020 अनिश्चित काळासाठी स्थगित; एमएस धोनीचे पुनरागमनही लांबणीवर, BCCI अधिकाऱ्याने केली पुष्टी)
नुकताच टी-20 विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलिया सध्या 37 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर इंग्लंड 29 गुणांसह दुसर्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेकडे 25 गुण आहेत. भारतीय संघ एकूण 23 गुणांसह पहिल्या चार संघात राहून विश्वचषकात प्रवेश केला आहे. आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये 2017 ते 2020 दरम्यान, आठही संघांनी एकमेकांविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळली. यजमान न्यूझीलंड आणि पुढील चार संघ या वनडे स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले होते.
3 ते 19 जुलै दरम्यान विश्वचषक पात्रता सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहेत, परंतु आता ते कोरोना विषाणूच्या साथीच्या स्थितीवर अवलंबून आहे. पात्रता स्पर्धेत उर्वरित तीन जागांसाठी दहा संघ एकमेकांशी भिडणार आहेत.