Harbhajan Singh (Photo Credit - X)

Harbhajan Singh Donates: पंजाबमध्ये सध्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्त भागात मोठे नुकसान झाले असून, आता मदतकार्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग पुढे सरसावला आहे. त्यांनी आपल्या परीने शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. हरभजन सिंग रुग्णवाहिकांपासून बोटींपर्यंत सर्व गोष्टींचा वापर करून पंजाबच्या लोकांसाठी मसीहा बनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरभजन सिंगने पंजाबमधील परिस्थिती पाहता 11 स्टीमर बोटी दिल्या आहेत. त्यांनी खासदार निधीतून 8 बोटी खरेदी केल्या, तर 3 बोटी स्वतःच्या पैशांनी घेतल्या. प्रत्येक बोटीची किंमत 4.5 ते 5.5 लाख रुपये आहे. याशिवाय, हरभजनने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तीन रुग्णवाहिकाही खरेदी केल्या आहेत, ज्यामुळे गरजू लोकांना रुग्णालयात पोहोचण्यास मदत होत आहे.

पंजाबमधील भयावह परिस्थिती

गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंजाबमधील परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत आणि शहरांमध्येही मोठे नुकसान झाले आहे. अनेक लोकांना आपले घर सोडून जावे लागले असून, पुरामुळे काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत सरकारसह अनेक मोठे सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे येत आहेत.

Asia Cup 2025 च्या आधी Team India ने नवीन जर्सी केली लॉन्च, चाहत्यांसाठी दिला खास संदेश! Video

मित्रांचीही मदत

आम आदमी पार्टीकडून राज्यसभा खासदार असलेल्या हरभजन सिंगने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. वृत्तानुसार, त्यांच्या सांगण्यावरून एका संस्थेने पंजाबमधील पूरग्रस्तांना 30 लाख रुपयांची मदत केली आहे. याशिवाय, त्यांच्या मित्रांनीही लाखो रुपयांचे दान केले आहे. आतापर्यंत 50 लाखाहून अधिक रुपये जमा झाले असल्याचे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त, हरभजनने स्टीमर बोटी आणि रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.