ENG vs AUS, Ashes 2019: डोक्याला दुखापत झाल्यास सबस्टिट्यूट खेळाडूला ही बॅटिंग! अॅशेस पासून नियम लागू होण्याची शक्यता
एरॉन फिंच आणि उस्मान ख्वाजा (AP/PTI Photo)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वकपच्या दमदार विजयाने इंग्लंड (England) संघाने पहिल्या विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. इंग्लंडमध्ये विश्वकपचे आयोजन करण्यात आले, त्यांनी ते जिंकले आणि आता सेलिब्रेशन देखील झाले. पण इंग्लंड संघ आता आगामी अॅशेस (Ashes) सीरिजवर आपले सर्व लक्ष केंद्रित करू पाहतोय. 1 ऑगस्ट पासून इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध अॅशेस टेस्ट सीरिज सुरु होणार आहे. ही टेस्ट सीरिज 16 सप्टेंबरपर्यंत खेळवण्यात येईल. पण यंदाच्या अॅशेस सीरिज दरम्यान आयसीसीकडून एक नवीन नियम लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या सीरिजपासून सबस्टिट्यूट खेळाडूचा नवीन नियम लागू होऊ शकतो. एखाद्या खेळाडू्च्या डोक्याला जखम झाली तर त्या खेळाडूऐवजी सबस्टिट्यूट खेळाडू खेळू शकतो. काही वर्षांनी या योजनेची अंमलबजावणी क्रिकेटच्या सर्व प्रकारात केली जाईल.

क्रिकइन्फो या वेबसाईटच्या वृत्तानुसार आयसीसीच्या सुरु असलेल्या वार्षिक बैठकीत हा नियम लागू करण्याबाबत चर्चा सुरु आहे. या नियमाला मंजुरी मिळताच लगेच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या माध्यमातून खेळवण्यात येणाऱ्या सगळ्या टेस्ट मॅचसाठी हा नियम लागू होईल.

2014 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ह्यूज (Phillip Hughes) याच्या डोक्याला चेंडू आदळल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तेव्हा पासून आयसीसीसाठी ही एक चिंतेची बाब होती. आयसीसीने 2017 मध्ये स्थानिक पातळीवर बदली खेळाडूचा नियम अमलात आणला आहे. दुसरीकडे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी बिग बॅश लीग (Big Bash League) व स्थानिक वनडेमध्ये असे बदली खेळाडू घेतले. 2018 मध्ये कौंटी क्रिकेटमध्ये देखील या नियमाचा उपयोग करण्यात आला होता.

यंदाच्या अॅशेस सिरीजसाठी इंग्लंडच्या जेसन रॉय (Jason Roy) याला संघात स्थान देण्यात आले आहे. रॉयची विश्वकपमधील आपल्या प्रभावी खेळी पाहता त्याला ही संधी दिली गेली आहे. इंग्लंडच्या विश्वविजयात रॉयचा महत्वाचा वाटा होता. रॉयने जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) च्या साथीने संघाला चांगली सुरुवात करून देण्यास सहाय्य केले.