DC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी
शिखर धवन (Photo Credit: PTI)

DC vs PBKS IPL 2021 Match 10: आयपीएलच्या (IPL) 11व्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) दिलेल्या 205 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 18.2 ओव्हरमध्ये शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) दमदार 92 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 6 विकेटने विजय मिळवला. दिल्लीकडून धवनने सर्वाधिक धावा करत संघाच्या विजयाचा पाया घातला. कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) 15 धावा केल्या, तर ललित यादव आणि मार्कस स्टोइनिसच्या जोडीने संघाला विजयीरेष ओलांडून दिली. यादव 12 धावा आणि स्टोइनिस 23 धावा करून नाबाद परतला. पृथ्वी शॉने 32 धावांचे योगदान दिले तर आजच्या सामन्यातून कॅपिटल्स संघाकडून पदार्पण करणारा स्टिव्ह स्मिथ 9 धावाच करू शकला. अशाप्रकारे आजच्या सामन्यातील विजयाने दिल्ली संघ विजय पथावर परतला तर पंजाब किंग्सला सलग दुसऱ्या पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. संघाकडून अर्शदीप सिंह, झे रिचर्डसन आणि रिले मेरीडिथ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. शिवाय, मोहम्मद शमी महागडा गोलंदाज ठरला. (IPL 2021 Points Table Updated: सलग तिसऱ्या विजयासह RCB ची अव्वल स्थानी झेप, KKR ची घसरण)

वानखेडे स्टेडियमवर पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करता दिल्लीकडून पृथ्वी आणि धवन सलामीला उतरले. त्यांनी सुरुवातीपासून आक्रमक फटकेबाजी केली मात्र, 59 धावांची अर्धशतकी भागीदारी झाली असताना शॉ मोठा फटका मारण्याच्या नादात अर्शदीपच्या गोलंदाजीवर क्रिस गेलकडे झेलबाद झाला. त्याच्यानंतर धवनला साथ देण्यासाठी स्मिथ मैदानावर आला. यादरम्यान धवनने आपलं 43वं आयपीएल अर्धशतक ठोकलं. त्यानंतर संथगिरीने खेळणाऱ्या स्मिथला मेरीडिथने स्वस्तात तंबूत पाठवलं. दोन विकेट झटपट पडल्यावर देखील धवनने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली व सलग 3 चेंडूत 3 चौकार लगावत विरोधी गोलंदाजांवर दबाव आणला. तथापि निर्णायक क्षणी आपल्या तिसऱ्या आयपीएल शतकाच्या जवळ असताना धवन 92 धावा करुन माघारी परतला.

यापूर्वी, टॉस गमावून पहिले फलंदाजी करत पंजाबसाठी कर्णधार केएल राहुल आणि सलामी जोडीदार मयंक अग्रवालने शतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. क्रिस गेल 11 धावा करून तंबूत परतला तर अखेरच्या क्षणी दीपक हुड्डाच्या नाबाद 22 धावा आणि शाहरुख खानने नाबाद 15 धावांच्या जोरावर पंजाबने वानखेडे स्टेडियमवर आव्हानात्मक धावसंख्या गाठली पण गचाळ फिल्डिंग आणि खराब गोलंदाजीमुळे संघाचा पराभव झाला.