
Bhuvneshwar Kumar IPL Record: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा वेगवान भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League 2025) मध्ये एक नवा विक्रम रचला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज तो बनला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जचा माजी गोलंदाज ड्वेन ब्राव्होला मागे टाकले आहे. सोमवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात तिलक वर्माची विकेट घेऊन भुवनेश्वर कुमारने हा विक्रम गाठला.
35 वर्षीय भुवनेश्वरने 179 आयपीएल सामन्यांमध्ये 184 विकेट घेतल्या आहेत. या कामगिरीसह, भुवनेश्वर कुमार आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या पुढे फक्त युजवेंद्र चहल (206 विकेट) आणि पियुष चावला (192 विकेट) आहेत.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारे पाच जलद गोलंदाज:
भुवनेश्वर कुमार - 184 विकेट्स (179 डाव)
ड्वेन ब्राव्हो - 183 विकेट्स (158 डाव)
लसिथ मलिंगा - 170 विकेट्स (122 डाव)
जसप्रीत बुमराह - 165 विकेट्स (134 डाव)
उमेश यादव - 144विकेट्स (147 डाव)
या हंगामात, मुंबई इंडियन्सविरुद्ध विकेट घेणे भुवनेश्वर कुमारचा चालू आयपीएलमधील तिसरा सामना होता. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मोसमातील पहिला सामना वगळता, तो आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये खेळला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये येण्यापूर्वी, भुवनेश्वर कुमार गेल्या 11 वर्षांपासून सनरायझर्स हैदराबादसोबत होता.
या बद्दल बोलताना भुवनेश्वर कुमार म्हणाला की, "एका संघासाठी 11 वर्षे खेळणे आणि नंतर नवीन संघात जाणे हे कोणासाठीही आव्हानात्मक असते. पण रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमधील वातावरण खूप वेगळे आहे. ते ज्या पद्धतीने सर्व खेळाडूंचे स्वागत करतात आणि त्यांना पाठिंबा देतात ते खरोखरच खास आहे. बेंगळुरूमध्ये असणे ही एक उत्तम भावना आहे."