Sourav Ganguly Health Update: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना आज रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
Sourav Ganguly Health Update (Photo Credits: Twitter)

भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना 27 जानेवारीला कोलकात्याच्या अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 29 जानेवारी रोजी त्यांची दुसरी अँजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र आज रुग्णालयाकडून त्यांची सर्व वैद्यकिय तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला आहे. महिन्याभरापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची एक अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा 29 जानेवारीला त्यांची दुसरी अँजिओप्लास्टी झाली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

त्याचबरोबर सौरव गांगुली यांच्या नसांमध्ये ब्लॉकेज आढळल्याने त्यांच्या शरीरात दोन स्टेंट टाकण्यात आले आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, संपूर्ण चाचण्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला. माहितीनुसार, सौरव गांगुली आपल्या रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. दरम्यान, सौरव गांगुली रुग्णालयात पोहोचताच पुन्हा एकदा त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं गेलं होतं.हेदेखील वाचा- Sourav Ganguly Health Update: सौरव गांगुलीची दुस-यांदा होणार अँजिओप्लास्टी, दोन स्टेंट लावण्यात आल्या

सौरव गांगुली यांच्यावर गुरुवारी हृदयविकारतज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी आणि डॉ. अश्विन मेहता यांच्यासह डॉक्टरांच्या पथकाने अँजिओप्लास्टी केली.

काही दिवसांपूर्वीच म्हणजे 2 जानेवारी रोजी सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर 7 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या गांगुलीने 113 टेस्ट आणि 311 वनडे सामने खेळले. गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 21 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे.