ताहलिया मॅकग्रा आणि बेथ मूनी (Photo Credit: Twitter/ICC)

AUS-W vs IND-W 2nd ODI: क्वीन्सलँडच्या मॅके येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात मिताली राजच्या भारतीय संघाला (Indian Team) गचाळ क्षेत्ररक्षणाचा जबरदस्त फटका बसला. टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 274 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात कांगारू संघाने 5 विकेटने रोमहर्षक विजय मिळवला. कांगारू संघाला वनडेमधील हा सलग 26 विजय ठरला. महिला एकदिवसीय सामन्यातील हा तिसरा यशस्वी धावांचा पाठलाग आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा (Australia) सलग 26 वा वनडे विजय आहे. एकावेळी भारतीय संघ विजयीरेष ओलांडेला असे दिसत असताना बेथ मुनी (Beth Mooney) आणि ताहलिया मॅकग्रा (Tahliya McGrath) यांनी संयमी फलंदाजी करत सामन्याचा निकाल बदलला. आणि भारताच्या तोंडून विजयाचा घास खेचून आणला. पहिले फलंदाजी करून भारताने 274/7 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात कांगारू संघाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियासाठी ताहलिया मॅकग्राने 74 धावा केल्या. तर सलामीवीर बेथ मुनी 125 धावा करून नाबाद परतली. यादरम्यान मुनीला अनेकदा जीवनदान मिळाले. निकोला कॅरीने 39 धावांचे नाबाद योगदान दिले. दुसरीकडे, भारतासाठी झुलन गोस्वामी, मेघना सिंह, पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

भारताने दिलेल्या रेकॉर्ड 274 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात कांगारू संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये गोस्वामीने एलिसा हिलीला शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर 6 धावा करून खेळणाऱ्या कर्णधार मेग लॅनिंगला मेघना सिंहने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. सिंहची वनडेमधील ही पहिली विकेट ठरली. गोलंदाजीत अपयशी ठरल्यावर एलिस पेरी बॅटने काही विशष करू शकली नाही. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तिला पूजा वस्त्राकरने माघारी धाडलं. या दरम्यान सलामीवीर मुनी तग धरून खेळत होती. तिला मॅकग्राने चांगली साथ दिली. दोघींनी आक्रमक भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना केला. दोघींनी चौथ्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली आणि संघाला डाव सावरला. या दोघींच्या जीवावर कांगारू संघ विजयी होती असे दिसत असताना दीप्तीने मॅकग्राला यस्तिका भाटियाकडे झेलबाद केले.

यापूर्वी भारताकडून सर्वात यशस्वी फलंदाज स्मृती मंधाना होती. मंधानाने 86 धावांची तुफानी खेळी खेळली. मंधाना आणि शेफाली वर्मा यांच्यात 74 धावांची सलामी भागीदारी झाली. शेफाली 22 धावा काढून बाद झाली. पण मंधाना एक टोक धरून खेळत राहिली. पहिल्या वनडेमध्ये जबरदस्त खेळ दाखवणाऱ्या मितालीची बॅट दुसऱ्या वनडेमध्ये शांत राहिली. तिला फक्त 8 धावा करता आल्या. पण, यानंतर मंधानाला स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषची साथ मिळाली. दोघींनी चौथ्या विकेटसाठी 76 धावा जोडल्या. स्मृती मंधानाने 94 चेंडूंचा सामना करत 86 धावा केल्या. घोषने 50 चेंडूत 44 धावांची खेळी खेळली. या दोघांव्यतिरिक्त, लोअर ऑर्डरमध्ये वस्त्राकरने 37 चेंडूत 29 धावा केल्या. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज मॅकग्रा होती, जिने 3 विकेट्स घेतल्या.