Ranji Trophy 2022: फेब्रुवारीमध्ये सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीसाठी बीसीसीआयने बनवले नवीन नियम, जाणून घ्या याविषयी अधिक
बीसीसीआय (Photo Credits: IANS)

भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामातील सर्वात महत्त्वाची स्पर्धा काही दिवसांत सुरू होणार आहे. अलीकडेच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ही स्पर्धा दोन टप्प्यात आयोजित करण्याची घोषणा केली होती. आता या संपूर्ण घटनेचे चित्र स्पष्ट झाले आहे. BCCI ने कोविड-19 महामारीच्या काळात 17 फेब्रुवारीपासून 38 संघांमध्ये नऊ वेगवेगळ्या बायो बबलमध्ये (Bio Bubble) रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) आयोजित करण्याची तयारी केली आहे. यासाठी बोर्डाने क्वारंटाइनपासून ट्रेनिंग आणि मॅचेसपर्यंतची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. त्यानुसार, सर्व संघांना पाच दिवसांच्या अनिवार्य क्वारंटाईनमधून (Quarantine) जावे लागेल. टीम सदस्यांची संख्या देखील 30 पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. ज्यात सपोर्ट स्टाफचा समावेश आहे.

आयपीएल 2022 च्या आधी आणि नंतर दोन टप्प्यात होणारी ही स्पर्धा 17 फेब्रुवारीपासून सुरू होईल, तर त्याआधी खेळाडूंना क्वारंटाईन करावे लागेल. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, मंगळवार 8 फेब्रुवारी रोजी बोर्डाने नऊ यजमान संघटनांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. या पाच पृष्ठांची मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की प्रत्येक संघात किमान 20 खेळाडूंसह जास्तीत जास्त 30 सदस्य असतील. संघांसोबत जास्तीत जास्त 10 सपोर्ट स्टाफ असू शकतो.

तसेच, संघ दोन खेळाडूंना कोविड राखीव म्हणून ठेवू शकतात. यासोबतच सर्व संघांचे आगमन आणि प्रशिक्षणाचा कालावधीही निश्चित करण्यात आला आहे. याअंतर्गत 10 फेब्रुवारीला सर्व संघ आपापल्या ठिकाणी पोहोचतील, त्यानंतर खेळाडूंना अनिवार्यपणे 5 दिवस क्वारंटाईन पूर्ण करावे लागेल. या दरम्यान, दुसऱ्या आणि पाचव्या दिवशी RT-PCR चाचण्या केल्या जातील. 15 आणि 16 फेब्रुवारीला संघाला सरावासाठी दोन दिवस असतील. हेही वाचा IND vs WI 2022: भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने केली कोरोनावर मात केली, जाणून घ्या रुतुराज गायकवाडाच्या तब्येतीचा अपडेट

संघांना त्यांच्यासोबत डॉक्टर ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल जेणेकरुन COVID-19 शी संबंधित प्रकरणे हाताळता येतील. बोर्डाने खेळाडूंची आर्थिक बाजूही विचारात घेतली असून, सर्व 20 खेळाडू मॅच फीसाठी पात्र ठरतील. प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना संपूर्ण फी मिळेल, तर उर्वरित नऊ खेळाडूंना 50 टक्के फी मिळेल. बोर्डाने सामन्याच्या होस्टिंग फीमध्येही वाढ केली आहे आणि ती वाढवून प्रत्येक सामन्याच्या दिवशी एक लाख 25 हजार रुपये केली आहे. यापूर्वी संपूर्ण सामन्यासाठी पाच लाख रुपये देण्यात आले होते.