उद्या जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सशक्त राज्यघटनेच्या पाठबळावरच राज्याची विकासाची वाटचाल सुरु आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या.

दुसरीकडे, ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. ‘शिका आणि संघटीत व्हा’ या त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक विविधतेच्या भारत देशाला एकता, समता, बंधूतेच्या सूत्रात बांधण्याचं, देशाची सार्वभौमता अखंडित ठेवण्याचं काम बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे शक्य झालं. नागरिकांना एका मताचा समान अधिकार, सर्वांना स्वाभिमानानं जगण्याची, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणारे डॉ. बाबासाहेब युगपुरुष होते. त्यांचे विचार हे कुठल्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते, तर अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे. डॉ. बाबासाहेबांचा मानवकल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणं, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा विकास करणं, हेच डॉ. बाबासाहेबांना खरं अभिवादन ठरेल,’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचं, विचारांचं, स्मृतींचं स्मरण करुन त्यांना वंदन केलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)