दिल्लीमध्ये आज नव्या संसद इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. सर्वधर्मीय पूजा विधी करून हा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. दरम्यान या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील अनेक खासदारांची अनुपस्थिती होती. कॉंग्रेस, एनसीपी, ठाकरे गट खासदार यांच्यासोबतच देशातील अन्य पक्षांचे खासदार देखील अनुपस्थितीत होते. पण यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया मात्र दिल्या आहेत. एनसीपी अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट हल्लाबोल केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्वीट करत टीपण्णी केली आहे. पहा कोण काय म्हणाले? New Parliament Inauguration Controversy: नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला 19 विरोधी पक्षांचा बहिष्कार; राष्ट्रपतींना निमंत्रित न करण्यावर उपस्थित केले प्रश्न .

शरद पवार

शरद पवार यांनी हा उद्घाटन सोहळा पाहून आपण न गेलो हे बरंच झालं असं म्हटलं आहे. पूजा विधी पाहून आपण देशाला पुन्हा 70 वर्ष मागे नेतोय का? असा प्रश्न डोकावल्याचं ते म्हणाले आहेत. हा कार्यक्रम मर्यादित लोकांसाठीच होता का? असंही त्यांनी विचारलं आहे. दरम्यान दिल्ल्लीच्या घरी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आली असेल तर ठाऊक नाही असंही ते म्हणाले आहेत.

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी देखील विरोधकांना विश्वासात न घेतल्यावरून नाराजी बोलून दाखवली आहे. बिल पास करण्यासाठी सत्ताधार्‍यांकडून फोन येतो मग अशा सोहळ्याला खासदारांना बोलवण्यासाठी व्हॉटसअ‍ॅप वर निमंत्रण देण्यापेक्षा एक फोन केला असता तर खासदारांनाही यायला आवडलं असतं असं त्या म्हणाल्या आहेत.

राहुल गांधी

राहुल गांधी यांनी नव्या संसद इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावरून मोदींना लक्ष्य केले आहे. त्यांनी हा लोकशाहीचा सोहळा होता पण मोदींना तो राज्याभिषेक सोहळा असल्यासारखं वाटत होतं असं म्हटलं आहे.

राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे खासदार संसदेत नाहीत मात्र त्यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर आपली प्रतिक्रिया देताना भारतीय लोकशाही चिरायू होवो. असं म्हटलं आहे पण ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. अशीही टीपण्णी केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)