दारु (Wine) पिलो पण तिची किक बसणे सोडा. साधी नशाही (Intoxication ) चढली नाही. त्यामुळे संतापलेल्या एका 42 वर्षीय व्यक्तीने थेट महसूल कार्यालय (Revenue Department) गाठले आणि तक्रार दिली. घटना आहे मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील उज्जैन येथील. लोकेश सोठिया असे या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीने महसूल अधिकाऱ्यांकडे दावा केला आहे की, कंपनीने तयार केलेली बनावट दारु दुकानदाराच्या माध्यमातून आपल्याला विकली गेली आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी घटनेची दखल घेऊन चौकशी सुरु केली आहे.
उज्जैन येथील बहादुर गंज परिसरातील रहिवासी लोकेश सोठिया यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, त्यानी 12 एप्रिल रोजी स्थानिक दुकानातून देशी दारुचे चार सीलबंद बॉटल खरेदी केल्या होत्या. त्यांनी आणि त्यांच्या मित्राने दोन बॉटलमधील दारुचे सेवन केले. परंतू, त्यांना कोणत्याही प्रकारची नशा झाली नाही. लोकेश यांनी म्हटले की, दुसऱ्या दोन बॉटल तर उघडल्याच नाही. जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा या दोन्ही बॉटल पूरावा म्हणून मी सादर करण्यास तयार आहे. (हेही वाचा, Liquor Sell: मद्यपींसाठी खुशखबर! राज्यात आता ई-टोकनद्वारे दारू विक्री; जाणून घ्या कसे कराल बुकिंग?)
आजवर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ झाल्याचे सर्वांनीच ऐकले होते. मात्र, आता दारुमध्येही भेसळ झाल्याचे प्रकार पुढे येऊ लागला आहे. हे योग्य नाही. ही ग्राहकांची शुद्ध फसवणूक आहे. मी या फसवणुकीविरोधात ग्राहक न्यायालयात जाईन असा इशाराही त्यांनी दिला आहे. लोकेश सेठीया हे पार्कींग चालवतात.
लोकेश सांगतात की, पाठीमागील 10 वर्षांपासून आपण दारुचे सेवन करतो. त्यामुळे दारुचा स्वाद आणि गुणवत्ता याबाबत आपल्याला पूर्ण कल्पना आहे. सोठिया यांनी म्हटले की, मी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि उज्जैनचे महसूल आयुक्त इंदर सिंह डामोर यांना मला विकण्यात आलेल्या बनावट दारुबद्दल तक्रार केली आहे. महसूल आयुक्त इंदर सिह डामोर यांनी सांगितले की, आपल्याकडे अशा प्रकारची तक्रार आली आहे. याबाबत आपण चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत कोणी दोषी आढळले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)