भल्या मोठ्या अजगराच्या (Pythons) विळख्यातून एका व्यक्तीचे प्राण थोडक्यात वाचले. या थरारक प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हँडलवरही हा व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतो. ही घटना केरळ (Kerala) राज्यातील तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) येथे घडली. अजगराने वेटोळे घातल्याने या इसमाचा श्वास कोंडला. त्यामुळे तो जिवाच्या अकांताने अजगराच्या विळख्यातून सुटण्याचा प्रयत्न करु लागला. हा प्रकार आजुबाजूच्या नागरिकांच्या ध्यानात येताच त्यांनी या व्यक्तिला अजगराच्या विळख्यापासून दूर केले.
प्राप्त माहितीनुसार, भुवचंद्रन नायर असे या व्यक्तिचे नाव आहे. तिरुवनंतपुरम येथे मनरेगा अंतर्गत सुरु असलेल्या उपक्रमात तो झाडे कापण्याचे काम करत होता. त्याच्यासोबत आणखी मजूरही काम करत होते. दरम्यान, काम करत असताना झाडातील अजगराने त्याच्या गळ्याला वेटोळे घातले. अजगर पाहून भुवचंद्रन घाबरला. त्याने अजगरापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजगराने त्याला विळख्यात घेतलेच. (हेही वाचा, #Video: कल्याण मध्ये भर रस्त्यात आढळला दोन तोंडाचा घोणस साप)
एएनआय ट्विट
#WATCH Kerala: A man was rescued from a python by locals after the snake constricted itself around his neck in Thiruvananthapuram, today. The snake was later handed over to forest officials and released in the forest. pic.twitter.com/uqWm4B6VOT
— ANI (@ANI) October 16, 2019
तब्बल 10 फूट लांबीच्या या अजगराने भुवचंद्रन नायर यांचे प्राण धोक्यात आणले. भुवचंद्रन याला अगजराने वेटोळे घातल्याचे ध्यानात येताच आजुबाजूचे कामगार त्याच्या बचावासाठी धावले. त्यांनी अजगराचे वेटोळे सोडवले. काहींनी अजगराचा जबडा पकडला. काहींनी शेपटी. कसेबसे वेटोळे सोडवले आणि भुवचंद्रन याचे प्राण वाचले.
कामगारांनी पकडलेला अजगर वनविभाग अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला. या धक्कादायक प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात भुवचंद्रन याच्या गळ्यातून अजगर काढताना नागरिक आणि भांबावलेले भुवचंद्रन दिसत आहे.