SN Lakshmi Sai Sri (Photo CRedits: ANI)

स्वयंपाक बनवणे आणि तो आवडीने लोकांना खाऊ घालणे या दोन्ही कला आहेत. आजकाल लहान असो की मोठा, मुलगा किंवा मुलगी प्रत्येकजणच स्वयंपाकघरात काहीना काही नवीन प्रयोग करताना दिसतो. आता स्वयंपाक बनवणे हे फक्त आई पुरतेच मर्यदित न राहता, आईकडून ते शिकून त्याद्वारे पुढे जाण्याचा एक मार्ग बनला आहे. याचे उदाहरण म्हणजे तामिळनाडूची एस.एन. लक्ष्मी साई श्री. (SN Lakshmi Sai Sri). तिने मंगळवारी चेन्नईत 58 मिनिटांत 46 पदार्थ बनवून युनिको बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (UNICO Book of World Records) आपले नाव कोरले.

चेन्नई येथील रहिवासी एस.एन. लक्ष्मी साई श्री म्हणाली की, तिने आपल्या आईकडून स्वयंपाक कसा बनवायचा याचे धडे घेतले आणि हळूहळू तिला या गोष्टीमध्ये रस वाटू लागला, पुढे ही तिची आवड बनली. आपल्याला मिळालेले यश पाहून आपण फारच खुश असल्याचे तिने सांगितले. न्यूज एजन्सी एएनआयने लक्ष्मीने बनवलेल्या पदार्थांचे फोटो शेअर केले आहेत. लक्ष्मीची आई एन कलीमागल यांनी सांगितले की, त्यांची मुलगी लक्ष्मीने लॉकडाऊन दरम्यान स्वयंपाक बनवण्यास सुरुवात केली व ती आता यामध्ये तरबेज झाली आहे. (हेही वाचा: जगातील सर्वात बुटकी महिला अशी नोंद असणार्‍या नागपूरच्या ज्योतीच्या आयुष्यातील 'या' गोष्टी 'ध्येयवेड्यां'साठी ठरू शकतात प्रेरणा)

एन कलीमागल म्हणाल्या, 'मी तामिळनाडूचे विविध पारंपारिक पदार्थ बनवते. लॉकडाऊन दरम्यान माझी मुलगी माझ्यासोबत स्वयंपाकघरात वेळ घालवायची. जेव्हा मी माझ्या पतीसोबत मुलीच्या स्वयंपाक करण्याच्या आवडीबद्दल चर्चा केली, तेव्हा त्यांनी स्वयंपाक करण्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्याचा प्रयत्न करण्याबाबत सुचवले.’ त्यानंतर लक्ष्मीच्या वडिलांनी स्वयंपाकाच्या जागतिक विक्रमांवर संशोधन करण्यास सुरवात केली. तेव्हा त्यांना आढळले की, केरळमधील सानवी या दहा वर्षांच्या मुलीने जवळजवळ 30 पदार्थ बनवले आहेत. त्यानंतर त्यांनी लक्ष्मीला हा विक्रम मोडण्यासाठी प्रेरणा दिली. जे लक्ष्मीने करून दाखविले.