DHL Cargo Plane Emergency Landing( PC - Twitter)

DHL Cargo Plane: मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका या देशात गुरुवारी एक भीषण विमान अपघात झाला. यामध्ये इमर्जन्सी लँडिंग करताना विमान मध्यभागी तुटल्याने त्याचे दोन तुकडे झाले. या विमान अपघाताची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोस्टा रिका (Costa Rica) मधील जुआन सांता मारिया (Juan Santa Maria) आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी हा अपघात झाला.

वास्तविक, DHL च्या मालवाहू विमानात काही यांत्रिक समस्या होती. त्यानंतर त्याचे जुआन सांता मारिया विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यादरम्यान त्याचे दोन तुकडे झाले. दिलासादायक बाब म्हणजे, अपघातग्रस्त विमान हे मालवाहू विमान होते. कार्गो विमानात फक्त दोन क्रू मेंबर्स होते. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. वैमानिकालाही कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. (हेही वाचा - विद्यार्थ्याला चढला Allu Arjun च्या 'Pushpa' चित्रपटाचा फिव्हर; 10वीच्या पेपरमध्ये लिहिले 'पुष्पा राज, अपुन लिखेगा नहीं साला')

जर्मन कंपनी DHL चे हे पिवळ्या रंगाचे विमान जमिनीवर आले तेव्हा त्यातून धूर निघत होता. असे सांगितले जात आहे की, ते धावपट्टीवरून घसरले आणि नंतर विमानाच्या मागील चाकाजवळ दोन तुकडे झाले.

गुरुवारी सकाळी 10.30 वाजता हा अपघात झाला. बोइंग-757 विमानाने सांता मारिया विमानतळावरून उड्डाण केले. पण त्यानंतर 25 मिनिटांनीच ते परत आले. कारण त्यात काही बिघाड होता. त्यामुळे या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. अपघातानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आले होते.