Kranthi Kumar Panikera | (Photo Credit - X)

Unique World Records: 'ड्रिल मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांती कुमार पणिकेरा (Kranthi Kumar Panikera) यांची एका अपारंपरिक कामगिरीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) द्वारे नोंद घेण्यात आली आहे. या पठ्ठ्याने केवळ एका मिनिटात आपल्या जिभेने 57 विद्युत पंख्याची पाती थांबवली आहेत. मुळचा तेलंगना राज्यातील सूर्यपेट येथील रहिवासी असलेला पनिकेरा त्याच्या धाडसी स्टंटसाठी ओळखला जातो आणि या ताज्या कामगिरीने तो सध्या इंटरनेटवर चर्चा, कौतुक आणि औत्सुक्याचा विषय ठरला आहे. त्याच्या या कामगिरीचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जो पाहून वापरकर्ते प्रतिक्रिया देत आहेत.

जिभेची ताकद, थांबली पंख्यांची पाती

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने इन्स्टाग्रामवर जॉ-ड्रॉप स्टंटचा (Jaw-Dropping Stunt) एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, क्रांती ड्रिलमन(Kranthi Drillman) याने बहुतेक इलेक्ट्रिक पंख्याचे पाते एका मिनिटात 57 मध्ये जीभने बंद केले. रंगीबेरंगी शर्ट आणि खाली लुंगी परिधान केलेला लांब केस असलेला क्रांती कुमार पणिकेरा आपल्या अजब कामगिरीने चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळते की, हा पठ्या विजेवर चालणारे वेगवान पंखे चक्क आपल्या जिभेने थांबवतो आहे. कोणत्याही प्रकारच्या हडांचा समावेश नसलेला आणि केवळ स्नायूंनी बनलेल्या जीभ या अवयवाचा त्याने केलेला वपर पाहून अनेक लोक अचंबित झाले आहेत. (हेही वाचा, World's Oldest Married Couple: 100 वर्षांचे वर, 102 वर्षांची वधू; जगातील सर्वात वयस्कर विवाहित जोडप्याच्या लग्नाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद)

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

क्रांती कुमार पणिकेरा याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. जो आतापर्यंत सुमारे 60 दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काही वापरकर्त्यांनी पनिकेराच्या चपळतेवर आश्चर्य व्यक्त केले, तर इतरांनी अशा स्टंटच्या सुरक्षिततेवर आणि उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकाने म्हटले, 'त्याची जीभ कशी कापली जात नाही?, दुसऱ्याने म्हटले 'ही नोंद घेण्याजोगी गोष्ट का आहे?' तिसरा म्हणतो 'ही प्रतिभा जपून आणि लपवून ठेवा'. एकाने मात्र फारच मजेशीर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला त्याच्या जीभेचा वापर एकदा औद्योगीक कारखान्यात करुन पाहायला हवा. (हेही वाचा, Smallest Washing Machine: भारतीय तरुणाने बनवली जगातील सर्वात लहान वॉशिंग मशीन; आकार केवळ 1.5 इंच, Guinness World Records मध्ये नोंद)

एकच नव्हे आणखी चार विक्रम नावावर

दरम्यान, तेलंगणातील एका छोट्या गावातून येणाऱ्या क्रांती कुमार पणिकेरा याने आपण कशी मोठी स्वप्ने पाहिली आणि ती सत्यात उतरवली याबाबत एक व्हिडिओ तयार केला आहे. जो त्याने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्याचा आजवरचा प्रवास सांगितला आहे. त्याने एका प्रतिक्रियेदरम्यान म्हटले आहे की, 'आज चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साध्य करणे अविश्वसनीय वाटते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने मान्यता दिल्याबद्दल मी खरोखरच सन्मानित आणि आभारी आहे'. पनिकेरा पुढे म्हणाले की, त्यांची कामगिरी ही त्यांनी वर्षानुवर्षे गुंतवलेल्या समर्पण आणि प्रयत्नांचा पुरावा आहे, ज्यामुळे इतरांना आव्हाने असूनही त्यांच्या आवडींचा पाठपुरावा करण्यास प्रेरणा मिळते.

उल्लेखनिय असे की, पनिकेराचा हा पहिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नाही, कारण त्याने आतापर्यंत गिणीजमध्ये एकूण चार विजेतेपदे मिळवली आहेत. त्याचे स्टंट प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असताना, ते अद्वितीय कामगिरीसाठी लोक किती टोकाचे प्रयत्न करतात हे देखील अधोरेखित करतात. पण अनेकांनी त्यांच्या या स्टंटबाजीवर सुरक्षेबाबतही मुद्दा उपस्थित केला आहे.