Instagram Stickers (Photo Credit : Instagram)

नुकतेच गुगलने ‘कन्नडा’चा उल्लेख सर्वात कुरूप भाषा म्हणून केला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनवर चक्क कर्नाटकच्या ध्वजाच्या रंगामध्ये बिकिनी व ब्रा विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. आता अशा प्रकारच्या वादामध्ये इंस्टाग्रामची (Instagram) भर पडली आहे. दिल्लीत हिंदू देवता भवान शिवला (Lord Shiva) आक्षेपार्ह पद्धतीने दाखवल्याबाबत सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील रहिवासी मनीष सिंह यांनी इंस्टाग्रामवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे.

एफआयआरमध्ये आरोप केला गेला आहे की, इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये उपलब्ध असलेल्या स्टिकर्समध्ये भगवान शंकर हातात द्रव पदार्थ (कदाचित वाइन) आणि मोबाइल घेतलेले दिसत आहेत. इन्स्टाग्राम स्टोरी सर्च बारमध्ये 'शिव' असे टाईप केल्यावर भगवान शंकरांच्या हे आक्षेपार्ह स्थितीचे पोस्टर दिसत आहे. हे स्टिकर कोणत्या सोशल मीडिया वापरकर्त्याने पोस्ट केलेले नाही, तर हे इंस्टाग्रामवरील स्टिकर्सच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. भगवान शंकरांच्या या स्टिकरबाबत अनेक वापरकर्त्यांनी यापूर्वी तक्रारी दाखल केल्या आहेत.

हिंदू समुदायाच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने हे GIF तयार करण्यात आले असल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे. या प्रकरणी इन्स्टाग्रामचे सीईओ व इतर अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, याआधी सोशल मीडिया अ‍ॅप्सवर धार्मिक सौहार्द बिघडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. धार्मिक मुद्द्यांव्यतिरिक्त असे अॅप्स राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरील वादाचा भागही ठरली आहेत. उदाहरणार्थ, फेसबुक आणि ट्विटरवर अनेकदा राजकीय आरोप केले गेले आहेत. त्याचबरोबर फेसबुकवर वंशवाद, धार्मिक कट्टरतावाद वाढण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.