शाळेतच झोपला; जाग येताच दप्तर समजून खुर्ची पाठीला अडकवून चालला (व्हिडिओ)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. व्हिडिओत दिसते की, एक मुलगा वर्गातच झोपला आहे. शिक्षक त्याचे दप्तर आवरतात आणि त्याला झोपेतून उठवतात. पण, खरी गंमत तर तेव्हा येते जेव्हा, तो झोपेच्या भरात दप्तर समजून खुर्चीच पाठीला लाऊन चालू लागतो.

प्राप्त माहितीनुसार, हा व्हिडिओ फिलीपीन्स येथील कॅविटे प्रांतातील आहे. हा विद्यार्थी ४ वर्षे वयाचा असल्याचे सांगितले जात आहे. वर्गात ज्या टेबलवर हा मुलगा आपले डोके ठेऊन झोपला आहे. तिथेच त्याची पूस्तकं, वही, दप्तर आणि इतर साहित्यही आहे. शाळा सुटताच शिक्षक या विद्यार्थ्याला उठवतात आणि त्याचे दप्तर आवरायला घेतात तेव्हा हा किस्सा घडला आहे.

विद्यार्थ्याचे हे अनपेक्षीत वागणे पाहून त्याचे वर्गमित्र आणि शिक्षकही चांगलेच पोट धरून हसतात. एक शिक्षक तर मोबाईलद्वारे या विद्यार्थ्याचा व्हिडिओही बनवताना दिसतात. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या विद्यार्थ्याचे नाव डीन लुईस पगताखन असे आहे. या विद्यार्थ्याची आजी एग्रेस रावेले ओरिलोस हिने आपल्या फेसबूक पेजवरून आपल्या नातवाचा (डीन लुईस) व्हिडिओ शेअर केला आहे. तिने व्हिडिओखाली कॅप्शन लिहिले आहे की, '..बस हा केवळ झोपण्यासाठीच शाळेत जातो'. आजीबाईंच्या या नातवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच लोकप्रिय झाला आहे.