Doctors Remove Leech From UP Man's Nose: डॉक्टरांनी 19 वर्षीय तरुणाच्या नाकातून काढली भलीमोठी जळू, उत्तर प्रदेशातील घटना
Nose Surgery | (Photo credit: archived, edited, representative image)

UP Man Leech in Nose Surgery: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन एका 19 वर्षीय तरुणाच्या नाकातून जिवंत जळू (Leech Removed from Man's Nose) काढली. हा तरुण आपल्या मित्रांसोबत धबधब्यावर सहलीला गेला होता. तिथे त्याच्या डाव्या नाकपुडीत जळू (Leech in Nose) शिरली. धक्कादायक म्हणजे या तरुणाच्या नाकात ती दोन आठवडे मुक्काम ठोकून होती. सुरुवातीला तरुणाच्या नाकात हुलहुळत होते. नंतर त्याचे रुपांतर नाक दुखण्यात झाले. त्यामुळे तो डॉक्टरांकडे पोहोचला असता डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या नाकात जिवंत जळू आढळून आली.

डाव्या नाकपुडीमध्ये शिरली जळू

सेसिल अँड्र्यू असे या तरुण रुग्णाचे नाव आहे. डॉक्टरांना तपासणी केल्यावर अँड्र्यूच्या डाव्या नाकपुडीमध्ये खोलवर एक जिवंत जळू आढळून आली. रुग्णालयाच्या ENT विभागातील शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चंद्र वर्मा यांनी ही शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या पद्धतीचा वापर करून केली. या शस्त्रक्रियांपासून नाकातील इतर पेशींना कोणताही धक्का बसणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. (हेही वाचा, UP Shocker: नवऱ्याने दाताने तोडला बायकोच्या नाकाचा लचका; मांसाचा तुकडा घेऊन पोहोचला पोलीस ठाण्यात, जाणून घ्या कारण)

धबधब्यात आंघोळ करताना घडली घटना

अधिक माहिती अशी की, दोन आठवड्यांपूर्वी उत्तराखंडमधील कॉलेज संपल्यानंतर सोसिल अँड्र्यू त्याच्या मित्रांसह उत्तराखंडला सहलीला गेला होता. या सहलीत त्यांनी एक निसर्गरम्य धबधबा शोधला आणि त्याच्या पाण्यात त्याने मित्रांसोबत आंघोळ केली होती. मित्रांसोबत मजामस्ती करताना एक जळू त्याच्या नाकात गेली. तलावात किंवा तलावातील पाण्याने आंघोळ करणाऱ्या लोकांच्या शरीराच्या बाहेरील भागात जळू चिकटलेली दिसतात. पण नाकात जळू सापडणे ही विचित्र बाब मानली जात आहे. (हेहीवाचा, Nose Transplant Surgery: आश्चर्यजनक! फ्रान्समध्ये विचित्र शस्त्रक्रिया; डॉक्टरांनी रुग्णाच्या हातावर वाढवलेल्या नाकाचं केलं चेहऱ्यावर प्रत्यारोपण)

दुर्मिळ शस्त्रक्रिया

रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉ. वर्मा यांनी सांगितले की, नाकात जळू जाणे ही विचित्रच बाब आहे. पण, सुदैव असे की, ती जळू जिवंत होती पण ती रुग्णाच्या मेंदू किंवा डोळ्यापर्यंत गेली नाही. डॉ. वर्मा पुढे म्हणाले की, अँड्र्यू आता निरोगी आहे आणि प्रक्रियेतून बरे होत आहे.

जिवालाही होऊ शकतो धोका

दरम्यान, सोसिल याला सुरुवातीला कोणतीही अस्वस्थता जाणवली नाही. मात्र, काही दिवसांतच त्याला नाकाला खाज सुटणे, अधूनमधून रक्तस्त्राव होणे आणि नाकात विचित्र संवेदना जाणवणे, नाक हुळहूळणे अशा समस्या सुरु झाल्या. त्याच्या नाकातील लक्षणांबद्दल चिंताग्रस्त सेसिल डॉक्टरांना भेटला. डॉक्टरांनी त्याची तपासणी केलीअसता, त्याच्या डाव्या नाकपुडीमध्ये एक जळू सतत रक्त शोषत असल्याचे तपासणीत आढळून आले. डॉक्टरांनी चेतावणी दिली की उपचार न केल्यास, परजीवी जंतू मेंदू किंवा डोळ्यासारख्या गंभीर भागात पुढे जाऊन गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतो.

परिस्थितीची संभाव्य तीव्रता लक्षात घेऊन, नाझरेथ हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दुर्बिणीच्या पद्धतीचा वापर करून आजूबाजूच्या ऊतींना कोणतेही नुकसान होणार नाही याची खात्री करून यशस्वीपणे जळू काढली.