Pune Viral Video

गेल्या काही वर्षांत पुण्याने (Pune) आईटी क्षेत्रात उत्तम प्रगती करून भारताच्या नकाशावर स्वतःचा एक खास ठसा उमटवला आहे. हिंजवडी या पुण्यातील आयटी हबमध्ये इन्फोसिस, टेक महिंद्रा, कॉग्निझंट, केपीआयटी कमिन्स इन्फोसिस्टम्ससारख्या अनेक प्रसिद्ध बहुराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्या आहेत. यामुळे मोठ्या संख्येने तरुण नोकरीसाठी पुण्याला पसंती देत आहेत. मात्र कोरोनानंतर मंदीला सुरुवात झाली आणि अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकर कपात करायला सुरुवात केली. आजकाल दररोज बेरोजगारीच्या बातम्या समोर येत आहेत. अशात सोशल मिडियावर पुण्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.

पुण्याच्या आयटी हब, हिंजवडी येथील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, अंदाजे 3,000 अभियंते नोकरीसाठी एका कंपनीबाहेर रांगेत उभे असलेले दिसत आहेत. इथल्या एका आयटी फर्ममध्ये ज्युनियर डेव्हलपरच्या पदासाठी वॉक-इन इंटरव्ह्यू सुरु होते त्यावेळी जवळजवळ 2,900 हून अधिक रिझ्युमे सादर केले गेले. व्हिडिओमध्ये तरून आपले रेझ्युमे हातात घेऊन इंटरव्ह्यूसाठी रांगेत उभे असलेले दिसत आहेत. ही रांग फारच मोठी आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सध्याच्या जॉब मार्केटबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, ब्लूमबर्गच्या मते सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) नुसार, ऑक्टोबर 2023 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 10.09% या दोन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. जुलै-सप्टेंबर या कालावधीत बेरोजगारीचा उच्च दर हे देशातील कोविड-संबंधित निर्बंधांच्या प्रदीर्घ प्रभावामुळे होते. पण, अहवालात असे म्हटले आहे की, भारताचा दिवसेंदिवस विकास आणि प्रगती होत असतानाही बेरोजगार लोक का असे रांगेत उभे आहेत? हा मोठा प्रश्न आहे. (हेही वाचा: Ola वापरकर्त्याने बुक केली 730 रुपयांची राइड, प्रवास संपल्यावर मिळाले 5000 रुपयांचे बिल; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर)

देशातील 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 'पत्रिका'ने केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात, बेरोजगारी आणि महागाई हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे 50 टक्के लोकांचे मत असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे की, बेरोजगारीच्या बाबतीत हिमाचल प्रदेशचे नाव आघाडीवर आहे. 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये (जुलै-सप्टेंबर 2022 पासून डिसेंबर 2023 पर्यंत) येथे सर्वाधिक बेरोजगारी दर दिसून आला. यानंतर, यादीत पुढचे नाव आहे राजस्थान आणि तिसऱ्या क्रमांकावर जम्मू-काश्मीर आहे.