आता गायी आणि बैलांसाठीही डेटिंग अ‍ॅप; जाणून घ्या काय आहे खासियत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

आजकालच्या तरुणाईसाठी डेटिंग अ‍ॅप (Dating App) ही काळाची गरज बनली आहे. मोठ्या शहरांमध्ये सुरु झालेली ही सोय आता छोट्या शहरांमध्येही लोकप्रिय ठरत आहे. तरुणांची ही वाढती गरज पाहून अनेक कंपन्या यात उतरल्या. फेसबुकनेही त्यांचे डेटिंग अ‍ॅप सुरु केले. मात्र यामध्ये नेहमीच अव्वल ठरले ते टिंडर (Tinder). याच धर्तीवर आता गायी आणि बैलांसाठीही एक अ‍ॅप बाजारात आले आहे. Tudder असे या अ‍ॅपचे नाव असून, ते टिंडरप्रमाणे कार्य करते. म्हणजे आता तुम्ही स्वतः तुमच्या गायीसाठी योग्य तो बैल शोधू शकणार आहात.

गायी आणि बैलांचे प्रोफाइल या अ‍ॅपवर असतात. या दोघांचीही सर्व माहिती प्रोफाइलमध्ये द्यावी लागते. तुमच्या गायीसाठी जो बैल तुम्हाला पसंत असेल त्याच्यावर राईट स्वाईप करून तुम्ही त्या बैलाच्या मालकाशी बोलू शकता. सर्व गोष्टी जुळल्यानंतर या दोघांना प्रजननासाठी एकत्र आणले जाते. सध्या हे अ‍ॅप ब्रिटनमध्ये चांगलेच लोकप्रिय ठरले असून, इतर देशांतही त्याचा वापर वाढत आहे.

या अ‍ॅपचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे. चुकीच्या बैलाकडून प्रजनन करून घेतल्याने, मिळणाऱ्या दुधावर परिणाम घडत असे. मात्र आता गायींचे मालक प्रजननासाठी स्वतः बैल निवडू शकणार आहेत. सध्या या अ‍ॅपवर तब्बल 42,000 शेतकऱ्यांनी आपल्या गायी आणि बैलांसाठी प्रोफाइल उघडल्या आहेत.