रेल्वे स्टेशनवर भीक मागून गुजराण करणारी एक महिला लता मंगेशकर यांचे गाणे गाते काय, ते गाणे क्षणार्धात व्हायरल होते काय आणि ही महिला रातोरात स्टार बनते काय. रानू मंडल (Ranu Mandal) यांच्या जीवनाचा हा स्वप्नवत वाटणारा प्रवास आहे. मात्र आता रानू मंडल यांना तुम्ही विसरून जाल असा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क 2 वर्षांची चिमुरडी लता मंगेशकर यांचे, ‘लग जा गले...’ (Lag Jaa Gale) हे गाणे गाताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे इतक्या लहान मुलीला या गाण्याचे शब्द लक्षात आहेत हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
1964 साली आलेल्या वो कौन थी सिनेमातील हे अजरामर गीत आहे. ज्या मुलीने हे गीत गायले आहे तिचे नाव आहे प्रज्ञा मेधा (Pragya Medha). या मुलीचा हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. अगदी गायक आणि सेलेब्ज यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर प्रज्ञाच्या या गाण्यामुळे लोक खूप प्रभावित झाले आहेत. इतकेच नाही तर या मुलीने गायलेले बंगाली गाणेही व्हायरल होत आहे. प्रज्ञाने बिदाई ब्योमकेश (Bidaay Byomkesh) या चित्रपटातील ‘सोंधे नामार आगे..’ (Shondhye Namar Aagey) गाणे गायले आहे.
परमेश्वर काळा कोणत्या रुपात, कोणत्याही वेळी देईल याचा काही नेम नाही. रेल्वे स्टेशनवरील रानू मंडल यांना प्रसिद्ध करणारे गाणे हेच होते, आता तेच गाणे गावून ही दोन वर्षांची मुलगी व्हायरल होत आहे. दरम्यान रानू मंडल यांच्या त्या गाण्यानंतर चक्क हिमेश रेशमीया यांनी त्यांना चित्रपटात गायची संधी दिली. आता रानू मंडल यांच्याकडे अनेक गाण्याचे प्रोजेक्ट्स आहेत.