Nandi Drinking Milk | (Photo Credits: Twitter)

Latur Nandi Drinking Milk Viral Video: गणपती दूध पितो, कुठेतरी समुद्राचे पाणी गोडे झाले, कोठे कोणाच्या अंगावर भांडी चिकटू लागली अशा एक ना अनेक गोष्टी वारंवार चर्चेला येतात. लोकही भाबडेपणे तिकडे धाव घेतात आणि पुढे असे काहीच होत नसल्याचे विज्ञानाच्या जोरावर सिद्ध होते. असाच काहीसा प्रकार नाशिक येथील एका मंदिरात घडला आहे. लातूर जिल्ह्यातील महाळंग्रा, दावतपूर आणि आर्वी या गावातील महादेव मंदिरातील नंदी दूध पितो अशी एक आवई उठली आणि चमत्कार पाहण्यासाठी लोक गर्दी करु लागले. काहींनी तर कहर केला चमत्कार पाहण्यासाठी येताना सोबत चमचे आणि दुधांनी भरलेल्या वाट्याही आणल्या. ते इतक्यावरच थांबले नाहीत. या उपोद्यापाचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावरही व्हायरल केले.

लोकांनी केलेला दावा आणि व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता असा काहीच प्रकार घडत नसल्याचे त्यांनी प्रात्यक्षिकांसह दाखवून दिले. ज्यांनी कोणी नंदी दूध पितो हा चमत्कार असल्याचे सांगितले आहे त्यांनी समोर यावे. त्यांना हा चमत्कार नाही हे आम्ही काणांसह दाखवून देऊ अस आव्हानच अंनिसने दिले आहे.

अंनिसचे कार्यकर्ते आणि विज्ञानवादी अभ्यासकांनी सांगितले की, नंदी असा दूध वगैरे पीत नाही. जेव्हा आपण पाणी किंवा दुध चमचाद्वारे नंदीच्या तोंडाजवळ नेते तेव्हा केशाकर्शन नियमाने हे दुध नंदिकडे खेचले जाते आणि त्याच्या कळ्यावरुन उताराने खाली जमिनीकडे ओघळत जाते. इतकाच या गोष्टीचा मर्यादित अर्थ आहे. याला कोणी चमत्कार वगैरे म्हणत असेल तर ते चूक आहे, असेही ते म्हणाले.

व्हिडिओ

दरम्यान, काही देवभोळ्या आणि चमत्कार माणणाऱ्या महाभागांनी याला चक्क अधिक मासातील अष्ठमीचा संदर्भ जोडला. अधिक महिना हा देवादिकांचा महिना असतो. त्यामुळे असे चमत्कार अशा महिन्यांमध्येच अधिक सक्षमतेने घडू शकतात, असे दावे केले. त्याचे व्हिडिओही व्हायरल केले. अंनिसने मात्र अशा दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले.