कोरोना विषाणूने (Coronavirus) भारतामध्ये शिरकाव केल्यानंतर मार्चमध्ये लॉक डाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आले. आता जवळजवळ अडीच महिन्यांनतर लॉक डाऊनच्या 5 व्या टप्प्यामध्ये नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. काही परिसरात नागरिकांना बाहेर फिरण्यास परवानगी देण्यात आली आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत अनेक लोक खोट्या बातम्या (Fake Messages), खोटे मेसेजेस किंवा तत्सम गोष्टी पसरवण्याचे काम करतात. आताही असाच एक मेसेज समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत असे सांगून एक मेसेज व्हायरल होत आहे, मात्र आता मुंबई पोलिसांनी हा संदेश खोटा असल्याचे सांगितले आहे.
या संदेशामध्ये नवीन मार्गदर्शक तत्वे नमूद केली आहेत, ज्यामध्ये- रस्त्याने जाताना शॉर्ट कटने किंवा निर्जन रस्त्याने जाऊ नये, जे लोक कॅब सेवेचा वापर करतात त्यांनी आपले लोकेशन आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवावे, बसमध्ये गर्दी असल्यास त्यात चढू नका, महागड्या गोष्टी बाळगू नका, बाहेर असताना फोनचा जास्त वापर करू नका, मॉल्स, बीच आणि उद्याने अशा ठिकाणी जास्त वेळा खर्च करू नका, मुलांना शिकवणीला जायचे असल्याचे मोठ्या लोकांनी त्यांना सोडावे व न्यायला जावे इ. अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. (हेही वाचा: 15 जूनपासून देशातील प्रत्येक भाषेत 'इंडिया' ऐवजी 'भारत' या नावाचा उल्लेख केला जाणार? वाचा सविस्तर)
पहा मुंबई पोलीस ट्वीट -
These guidelines have not been issued by Mumbai Police. Please do not share or circulate this with incorrect credentials & always verify facts from official authorities.And please #Dial100 in case of any untoward experience. #BustFakeInformation pic.twitter.com/kyk9umEhTD
— Mumbai Police (@MumbaiPolice) June 7, 2020
मात्र आता मुंबई पोलिसांनी ट्वीट करत हा संदेश मुंबई पोलिसांनी दिला नसल्याचे सांगितले आहे. ते म्हणतात, ‘समाजमाध्यमांद्वारे प्रसारीत होणाऱ्या मार्गदर्शक सूचना या अफवा आहेत. अशा कोणत्याही सूचना मुंबई पोलीसांकडून देण्यात आल्या नाहीत. अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. फक्त वैध कार्यालयाकडून प्रसारीत होणाऱ्या सूचनांवर विश्वास ठेवा. मदतीसाठी 100 नंबरवरती फोन करा.’ दरम्यान, याधीही अनेकवेळा मुंबई पोलिसांच्या नावे अनेक खोटे संदेश पसरवण्यात आले आहेत, मात्र प्रत्येकवेळी तत्परतेने पोलिसांनी असे संदेश खोडून काढले आहेत.