Escalator Malfunction at Andheri Station (Photo Credits: ANI)

प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईतील अनेक स्थानकावर सरकत्या जिन्यांची (Escalator) सोय करण्यात आली आहे. मात्र, बुधवारी अंधेरी रेल्वे स्थानकावर (Andheri Station) विचित्र प्रकार घडला. अंधेरी स्थानकावर अचानक सरकता जिना उलट्या दिशेनं (Backward Direction) धावू लागल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. या घटनेत 2 प्रवाशी जखमी झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर असलेल्या अंधेरी स्थानकावर 17 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर दादरकडील दिशेला असलेला सरकता जिना अचानक उलटा फिरु लागला. अपघातावेळी सरकत्या जीन्यावर प्रवाशांची गर्दी होती. परंतु, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा  - Gold Face Treatment Video: जगप्रसिद्ध मॉडेल बेला हदीद हिने केली 24K शुद्ध सोन्याने गोल्ड फेस ट्रीटमेंट; पाहा किती आला खर्च?)

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकत्या जिन्यातील तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अंधेरी स्थानकावरील सर्व जिन्याची तपासणी करण्यात येत आहे. अंधेरी स्थानकावर नेहमी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने काही स्टेशनवर सरकत्या जिन्यांची सोय केली आहे. मात्र, अशा प्रकारच्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे.