Stray Dog Dragged Scooter | (Photo Credit: X)

कर्नाटक (Karnataka) राज्यातील उडुपी (Udupi) येथील एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीने मानवी क्रौर्याची परिसीमा गाठली. त्याच्यावर आरोप आहे की, भटक्या कुत्र्याला स्कूटरला बांधून एक-दोन नव्हे तर तब्बल 6 किलोमीटर फटफटत (Stray Dog Tied Scooter and Dragged) नेले. आरोपीच्या कथीत कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Stray Dogs Viral Video) झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, उडपी येथील शिरवा ग्रामपंचायत इमारतीसमोरील रस्त्यावर शनिवारी (20 जुलै) रोजी ही घटना घडली. आरोपीचे कृत्य आणि कत्र्याच्या वेदना पाहून उपस्थित नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. त्याला या कृत्यापासून थांबविण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला पण आरोपीने कोणालाही जुमानले नाही. व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त होतो आहे.

प्राणी कल्याण सदस्याने नोंदवलेली घटना

प्राणि दया संघाच्या (Prani Daya Sangha) सदस्या मंजुळा करकेरा यांनी याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंजुळा यांना सकाळी 9.47 च्या सुमारास त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ प्राप्त झाला. ज्यामध्ये पाहायला मिळत होते की, एक व्यक्ती आपल्या स्कुटरला साकळीच्या सहाय्याने कुत्रा बांधून त्याला रस्त्यावरुन फरफटत नेत आहे. कुत्रा वेदनेने विव्हळत आहे. व्हिडिओमधील परिसर करकेरा यांनी ओळखला. त्यांच्या लक्षात आले की, हा भयंकर प्रकार सेंट मेरी जंक्शनवरून मंचकलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घडला आहे. त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क केला आणि सदर प्रकाराबाबत तक्रार दिली.

मंजुळा करकेरा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सदर इसमाचे वर्तन म्हणजे प्राण्यांसोबत केलेला अत्याचार आणि अमानवी वर्तन आहे. कुत्र्याला भयंकर इजा पोहोचविण्याच्या दृष्टीने आरोपीने त्याला साखळीने स्कुटरसोबत बांधले आणि रस्त्यावरुन फरफटत नेले. आम्ही स्थानिक नागरिकांकडून माहिती घेतली असता या व्यक्तीचे नाव अब्दुल खादर असून, तो कोम्बुगुड्डे येथील रहिवासी असल्याचे आढळून आले. याशिवाय वाहन चालविण्याच्या नियमांचे उल्लंघन करतानाही तो आढळून आला. स्कूटर हाकताना त्याने हेल्मेट परिधान केले नव्हते.

व्हिडिओ

इसमाविरोधात कायदेशीर कारवाई

दरम्यान, आरोपीविरोधात बीएनएस कलम 325 (प्राण्याला मारणे किंवा अपंग करणे, ज्यासाठी तुरुंगवास, किंवा दंड किंवा दोन्ही) आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून अधिक चौकशी करत आहोत. आरोपीला अधिक सजा होण्यासाठी आम्ही सखोल तपास करु, असे पोलिसांनी म्हटले आहे.