local train ladies coach logo (Photo Credits: File Image)

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणा-या लोकल रेल्वेमध्ये (Local Train) रोज काही ना काही बदल पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. मग ते बदल डब्यांच्या एकूण संख्याबाबत असो, आसनव्यवस्थांबाबत असो किंवा डब्यातील सुरक्षेबाबत असो. प्रवाशांना नेहमीच काही ना काही नवीन देण्याच्या प्रयत्नात असणारी मुंबई लोकल आता एका नवीन आणि अनपेक्षित बदलासह रेल्वेरुळांवरुन धावणार आहे. बदलत जाणा-या काळाबरोबर स्वत:ला बदलणा-या सक्षम महिलांची झलक मुंबई रेल्वेमधून दाखविण्यासाठी आता महिला कोचच्या डोक्यावर पदर घेतलेल्या महिलेचा लोगो बदलून त्याजागी ब्लेझर घातलेली मॉडर्न महिला घेणार आहे. पश्चिम रेल्वे ह्याबाबत विचार करत आहे. तसेच प्रवाशांना महिला कोचची माहिती व्हावी म्हणून महिला कोचबाहेर निळ्या रंगाचा निर्देशक लावण्याचाही विचार करत आहे.

मुंबई मिरर (Mumbai Mirror) ने दिलेल्या रिपोर्टनुसार, पश्चिम रेल्वे चे व्यवस्थापक ए.के.गुप्ता यांनी ह्या लोगो बदलण्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. एवढच नव्हे तर महिलांना प्रेरणा देतील अशा बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल, क्रिकेटपटू मिथाली राज आणि अंतराळवीर कल्पना चावला यांसारख्या अनेक नामवंत अशा महिलांची माहिती देणारे फलक ह्या डब्ब्यात लावण्यात येणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी लोकल रेल्वेची पाहणी केली असता, ए.के. गुप्ता यांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की ट्रेनमध्ये काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे. त्यावेळी त्यांना साडीतील महिला ही आजच्या काळातील नोकरदार महिलेला साजेशी अशी नाही असे वाटले. म्हणूनच त्यांनी हा लोगोच बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Local Horror: कुर्ला स्थानकावर मोबाईल चोराच्या हल्ल्यात धावत्या लोकल मधून पडून तरुणी जखमी; आरोपी ताब्यात

ह्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या टीमने मिळून अनेक चित्रे तयार केली. ती करता करता शेवटी त्यांना असे एक चित्र मिळाले, ज्यात ह्या महिलेने हाताची घडी घातली असून ब्लेझर घातले आहे. त्यात आजच्या काळातील महिलेचा आत्मविश्वास दिसून येतोय. लवकरच हे लोगो बदलण्याचे काम पूर्ण करुन नवीन लोगो असलेल्या रेल्वे रुळांवरुन धावताना दिसतील, असे ए.के.गुप्ता यांनी सांगितलय.