JioG After PUBG Ban? भारतात पबजी खेळावर बंदी घातल्यानंतर रिलायन्स लॉन्च करत आहे 'New Game JioG'; जाणून घ्या या व्हायरल बातमीमागील सत्य
Fake tweet on JioG replacing PUBG (Photo Credits: Twitter)

भारत आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने, राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत यापूर्वी शॉर्ट व्हिडीओ शेअरींग अॅप टिकटॉक सह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. आता बुधवारी भारत सरकारने 118 अॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये एक लोकप्रिय गेम पबजी (PUBG) या चिनी अ‍ॅपचाही समावेश आहे ज्यावर बंदी घातली गेली आहे. पबजी गेमवरील बंदीनंतर आता सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली की,  गेम पबजीच्या जागी रिलायन्स (Reliance) नवीन गेम New Game JioG घेऊन येत आहे.

या बातमीबाबत वृत्तसंस्था एएनआयच्या नावाने सोशल मीडियावर एक फेक ट्विटही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, मोदी सरकारने भारतात पबजी खेळावर बंदी घातल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी New Game JioG  घेऊन येत आहेत. मात्र मुकेश अंबानी खरच अशाप्रकारचा नवीन गेम सादर करत आहेत, या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. याबाबत मुकेश अंबानी किंवा रिलायन्स यांनी आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या व्यतिरिक्त, प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवर New Game JioG असे कोणतेही अ‍ॅप नाही.

न्यूज एजन्सी एएनआयलाचा हवाला देत जे ट्वीट व्हायरल होत आहे, त्यावर अनेकांनी विश्वास ठेवला व ही बातमी पुढे पसरवली. मात्र हे ट्वीट पूर्णतः खोटे आहे. या बनावट बातमीसह केलेल्या ट्विटला 2000 हून अधिक लाईक्स आणि 500 हून अधिक रिट्वीट मिळाले आहेत. (हेही वाचा: PUBG Among 118 Chinese Apps Banned: भारतात पबजी, लूडो गेमसह 118 मोबाईल ऍप्सवर बंदी; पाहा संपूर्ण यादी)

दरम्यान, सध्या संपूर्ण जगात पबजी गेम 600 दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केला गेला आहे. हा गेम 5 कोटी सक्रिय वापरकर्ते वापरत आहेत. महत्वाचे म्हणजे चीनमधील वापरकर्त्यांचा यात समावेश नाही. त्याचबरोबर, पबजी मोबाइलने या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 1.3 अब्ज डॉलर्स (सुमारे 9,731 कोटी रुपये) जागतिक कमाई केली आहे आणि त्याद्वारे कंपनीने आपल्या कार्यकाळात तीन अब्ज डॉलर्स (सुमारे 22,457 कोटी रुपये) कमाई केली आहे.