भारतीय वायूसेना (Indian Air Force) यांनी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीला (Aligarh Muslim University) 2009 मध्ये एक एअरकॉर्फ्ट (Aircraft) गिफ्ट केले होते. हे एअरकॉर्फ्ट युनिव्हर्सिटीने आपल्या कॅम्पसमध्ये इंस्टाल केले आहे. सोमवारी (3 ऑगस्ट) हे एअरक्रॉफ्ट OLX या वेबसाईटवर 9.99 कोटींना विक्रीस उपलब्ध असल्याचे पाहायला मिळाले. OLX वेबसाईटवर दिसत असणारी पोस्ट खोटी आणि चुकीची असून हा युनिव्हर्सिटीची बदनामी करण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याचे युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान ही बातमी प्रकाशझोतात येताच वेबसाईटवरुन पोस्ट काढून टाकण्यात आली आहे.
"एअरक्राफ्टच्या विक्रीची OLX वर टाकलेली पोस्ट ही चुकीची आहे. हे एअरक्राफ्ट विकण्याच्या दृष्टीने युनिव्हर्सिटीने कोणतेही पाऊल उचललेले नाही. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत," असे अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे प्रॉक्टर मोहम्मद वसिम अली यांनी सांगितले आहे. तसंच युनिव्हर्सिटीची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
2009 मध्ये भारतीय वायुसेनेचे प्रतिक म्हणून अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या इंजिनियरिंग विभागाच्या बाहेर हे एअरक्रॉफ्ट बसवण्यात आले होते. दरम्यान 3 ऑगस्ट रोजी OLX वर हे तब्बल 999,99,999 रुपयांना विक्रीस उपलब्ध असल्याचे पाहायला मिळाले. हे MiCO MiG-23BN फायटर प्लेन आहे. वायुसेनेमध्ये 28 वर्ष कार्यरत असलेल्या या विमानाला नंतर निवृत्ती देण्यात आली.
OLX वरील सेलची ही बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरु लागली. त्यानंतर युनिव्हर्सिटीच्या या भूमिकेवर युजर्सकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. हे प्रकरण समजताच युनिव्हर्सिटी अॅडमिनिस्ट्रेशनकडून त्वरीत पाऊल उचलण्यात आली आणि त्यानंतर ती जाहीरात काही वेळातच वेबसाईटवरुन हटवण्यात आली.