IKEA Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये सुरु झाले 'आयकिया' कंपनीचे फर्निचर स्टोअर; 7000 हून अधिक उत्पादने, 1500 कोटींची गुंतवणूक, पुढील दोन आठवड्यांसाठी बुकिंग फुल
IKEA outlet in Mumbai | (Photo Credits: Instagram/Ikea.India)

स्वीडिश किरकोळ विक्रेता कंपनी IKEA 18 डिसेंबर रोजी नवी मुंबई (Navi Mumbai) येथे भारतातील आपले दुसरे दुकान सुरू करत आहे. यासाठी कंपनीने सुमारे 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय मुंबईत अजून दोन छोटी स्टोअर उघडण्याची कंपनीची योजना असल्याचे कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले. IKEA ही फर्निचर, स्वयंपाकघर उपकरणे आणि घरातील सामान विकणारी किरकोळ विक्रेता कंपनी आहे. IKEA स्टोअरमध्ये कमी किंमतीत चांगली उत्पादने मिळतात. कंपनींचे नवी मुंबई येथील दुकान 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून सर्व ग्राहकांसाठी उघडले आहे.

IKEA ही जगातील सर्वात मोठी फर्निचर कंपनी मानली जाते. नवी मुंबईमधील हे स्टोअर दररोज सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत चालू असेल. हे स्टोअर मुंबईतील ठाणे बेलापूर रोडवर असून, तुर्भे स्थानकापासून सुमारे 600 मीटर अंतरावर आहे. नवी मुंबईमधील हे स्टोअर तब्बल 5.3 लाख चौरस फूट एरियामध्ये पसरले आहे. या ठिकाणी स्वस्त किंमतीत सुमारे 7000 हून अधिक सुंदर डिझाइन केलेले फर्निचर व घर सजावटीच्या वस्तू विकत घेता येतील.

2030 पर्यंत, IKEA ची केवळ महाराष्ट्रात 6000 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आहे. खासकरुन मुंबई हे कंपनीचे प्राधान्य आहे. IKEA India बेंगळुरूमध्ये आपल्या तिसऱ्या स्टोअरवर काम करत आहे आणि त्यानंतर दिल्लीतही स्टोअर उघडण्यात येणार आहे. मात्र कंपनीने यासाठी कोणतीही अंतिम मुदत दिलेली नाही. (हेही वाचा: Flipkart Big Saving Days Sale ला आजपासून सुरु, iPhone 11 Pro, ROG Phone 3 सह 'या' जबरदस्त स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट)

सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्राहकांना सुरक्षित खरेदीचा अनुभव मिळावा यासाठी IKEA ने प्री-बुकिंग करणे सक्तीचे केले आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवर पूर्व नोंदणीद्वारे स्टोअरमध्ये भेट देणाऱ्यांची संख्या निश्चित केली आहे, ज्याद्वारे ग्राहकांना स्टोअरला भेट देण्यासाठी ठराविक दिवस आणि स्लॉट देण्यात येईल. मात्र IKEA च्या वेबसाइटनुसार पुढील दोन आठवड्यांसाठी हे सर्व स्लॉट आधीच बुक झाले आहेत. ग्राहक ikea.com/in या वेबसाईटवर भेटीचे बुकिंग करू शकतील.